धुळे : धुळ्यात मुसळधार पाऊस सुरुच, गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांचा उत्साह कायम



धुळे : धुळ्यात हिंदू - मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेल्या खुनी गणपतीची 121 वर्षांची परंपरा अबाधित, खुनी गणपती पालखी विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिम भाविकांकडून मशिदीतून पुष्पवृष्टी, मुस्लिम भाविकांकडून गणरायाची आरती



मुंबई : लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैविध्यपूर्ण मिरवणुका पाहायला मिळत आहेत. यंदा बहुतेक मंडळांनी डॉल्बीला फाटा दिल्याचं पाहायला मिळतोय.



कोल्हापुरात ढोल-ताशे

कोल्हापूरमध्येही पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय. मानाच्या तुकाराम माळी गणपतीच्या मिरवणुकीला कोल्हापुरात सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघालीय. यासोबतच पारंपरिक वाद्यांचा नादही कोल्हापुरात घुमताना पहायला मिळतोय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली.



सांगलीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

सांगलीमध्येही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरु झाल्यात. घरगुती बाप्पांना निरोप देण्यासही भाविकांनी सुरुवात केलीय. मोठ्या भक्तीच्या वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय.



नाशिकच्या रस्त्यावर विसर्जनाची लगबग

नाशिकमध्येही घरगुती बाप्पा गावाला निघालेत. मोठ्या भक्तीमय वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप दिला जातोय. नाशिकच्या रस्त्या-रस्त्यावर बाप्पाच्या विसर्जनाची लगबग दिसून येतेय. बाप्पाचं विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या म्हणायलाही भाविक विसरत नाहीत.



औरंगाबादमध्ये डीजेला फाटा

औरंगाबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरु आहेत. यंदा डीजेला फाटा देऊन विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलाय. त्यामुळे बँडच्या तालावर मिरवणूक निघताना दिसतेय. डीजेलाही लाजवेल, असा ताल या मिरवणुकीत पहायला मिळतोय.



नागपूरचा राजा मार्गस्थ

नागपूरमध्येही गणेशाचं विसर्जन करण्याची लगबग सुरु आहे. नागपूरच्या रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या आहे. मोठ्या भक्तीभावाने नागरिकही आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. नागपूरच्या तलावात बाप्पांचं विधीवत विसर्जन केलं जातंय.



तुळशीबागेतून बाप्पाची मिरवणूक सुरु झाली असून, संध्याकाळी ५ च्या सुमारास कोराडी तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यात येईल.



जळगावात तरुणांच्या हाती टाळ

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात तरुणांनी टाळ  हाती घेऊन गणपतीची मिरवणूक काढली.. गरताड या गावात ही अऩोखी मिरवणूक काढली गेली..डॉल्बी, ढोल-ताशा यांचा वापर न करता साध्या पद्दतीनं मिरवणूक काढली जावी, असं आवाहन गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी केलं होतं. त्यानुसार वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार या गावात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली.



अहमदनगरमध्ये विसर्जन मिरवणूक

अहमदनगरच्या संगमनेरमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात झालीय. लोकमान्य टिळकांनी भेट दिलेल्या शहरातील सोमेश्वर मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. तत्पूर्वी, राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत आरती करण्यात आली. नगर जिल्ह्यातील विसर्जन मिरवणूक यंदा डीजे विरहीत असणार आहे, त्याची संगमनेरमध्ये काटेकोर अंमलबजावणी केली जातेय.