Gadchiroli Flood:  राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या एका टोकाला असलेल्या गडचिरोलीत पावसामुळं विदारक परिस्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 10 हजार नागरिकांचं स्थलांतर पुरामुळं करण्यात आलं आहे.  जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. महाराष्ट्र- तेलंगणा दरम्यानचा महत्त्वाचा वाहतूक दुवा असणाऱ्या नवा कालेश्वरम पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं तेलंगणाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. 


महाराष्ट्राच्या बाजूकडीव कालेश्वरम पुलाचा मार्ग महापुरात वाहून गेला आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मार्ग वाहून गेल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याबाबत तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासनाने या पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. नुकताच खुला झालेला हा पूल महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यानचा महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. आता रस्ताच वाहून गेल्यानं अनिश्चित काळासाठी वाहतूक बंद राहणार असल्याने या आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम होणार आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण 10 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे आहे.  पावसाच्या सरी अधून-मधून बरसत आहेत. वैनगंगा- गोदावरी आणि प्राणहिता नद्यांना आलेल्या पुरामुळं अनेक गावांमध्ये पाणी आहे. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. आलापल्ली ते भामरागड हा रस्ता पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने  खुला झाला आहे. तर गडचिरोली ते आरमोरी मार्गही पाल नदीचे पाणी ओसरल्याने सुरु झाला आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित झाल्यानंतर काही प्रमुख मार्ग अद्यापही बंद आहेत. 


राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या पावसात 99 जणांचा बळी गेलाय. तर 181 जनावरं दगावलीत. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Mumbai Rains LIVE: मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस, हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत पर्यटकांना बंदी


Maharashtra Rains : राज्यभरात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू


Maharashtra Mumbai Rains : राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस, रायगडसह पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट