Nagpur News : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. 15 ऑगस्टला वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी अशी विनंती या पत्रातून पंतप्रधान मोदींना आशिष देशमुखांनी केली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 लहान राज्यांची निर्मिती करावी, सुरुवात विदर्भापासून करावी, असंही पत्रात म्हटलं आहे. 


पत्रात त्यांनी अमेरिका आणि स्वित्झर्लन्डच्या राज्यांचे उदाहरण देऊन म्हटलं आहे की, आपल्या राज्यांची लोकसंख्या ही नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या तुलनेत जास्त आहे.  नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या राज्यांचे दरडोई उत्पन्न दुपट्ट झाले आहे.  विदर्भ मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे.  इथे शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या, नवीन उद्योग न येणे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सेवा क्षेत्रांमध्ये न होणारी गुंतवणूक, उद्योगांची अधोगती, बेरोजगारी, नक्षलवाद, कुपोषण, पर्यटन विकास, खनिज संपदेचा योग्य वापर असे अनेक गंभीर प्रश्न कायम दुर्लक्षित आहे, असं पत्रात म्हटलं आहे.  


पत्रात देशमुखांनी म्हटलंय की, महाराष्ट्राची स्वतःची आर्थिक परिस्थिती खालावलेली असून राज्य स्वतःच्याच गरजा पूर्ण करू शकत नसेल तर एका वेगळ्या राज्याएवढी लोकसंख्या आणि त्याहून मोठे प्रश्न असलेल्या विदर्भाच्या गरजा महाराष्ट्रात कशा पूर्ण होऊ शकतील.  फक्त 29 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमुळे भारतातील विविधता अपूर्ण आणि अयोग्यरीत्या व्यक्त केली जात आहे. खोलवर बसलेल्या बदलाची वेळ आता आली आहे, असं पत्रात म्हटलं आहे. 


आशिष देशमुखांनी म्हटलंय की, 75 राज्यांची प्रत्येकी लोकसंख्या दोन कोटी असेल प्रत्येक राज्यातून लोकसभेत दहा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असावेत.  निवडणुका ही एकत्र झाल्या पाहिजे, असंही पत्रात म्हटलं आहे.  


विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश आजही मूलभूत सुविधांसाठी झगडतोय


पत्रात म्हटलं आहे की, भारताचा विकास निर्देशांक अत्यंत कमी आहे. विकासाच्या दृष्टीने लहान राज्यांची गरज बघता 15 ऑगस्टला विदर्भ या तिसाव्या राज्याची निर्मिती करावी ही विनंती, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या लहान राज्यांचे दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, वाढलेले सिंचन, आरोग्य सुविधा, शिक्षण, लोकांना सुरक्षितता वाटेल अशी कायदा व सुव्यवस्था, रस्ते, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था, लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना, मुबलक वीज, पर्यायाने वाढलेले रोजगार अशी विविधांगी प्रगती तिथे होते आहे. पण, विदर्भात असे विकासाचे चित्र अजिबात दिसत नाही. ते निर्माण केल्याशिवाय विदर्भात आर्थिक समृद्धी येणे अशक्य आहे.