Nagpur Rain : नागपूर ग्रामीण तहसीलमधील जुनापाणी या गावातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आज सकाळी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे गावातील 15 शेळ्या वाहून गेल्या आहेत. गावकऱ्यांनी वेळीच गावाजवळच्या उंच भागाकडे धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलावातून पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने तसेच शेतीच्या दिशेने आला. यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात माती आणि चिखल सर्वत्र पसरला आहे.


दरम्यान, या घटनेनंतर तहसीलदार आशिष वानखेडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली, तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद देखील साधला.  हा तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी (खुर्द) येथील मामा तलाव फुटल्याचीही घटना घडली आहे. शेतात पाणी शिरल्यानं याठिकाणी देखील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नागपूर जिल्हा परिषदच्या आखत्यारीत हा तलाव आहे. तलावाची भिंत फुटल्याने तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलावाला लागून एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या महापुरानं तलावाच्या भिंतीला तडे गेल्याने ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.




राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस


सद्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. एनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. 


दरम्यान, मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज रायगड पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: