स्फोटकांचा साठा हस्तगत, नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
Gadchiroli Naxal : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलानं मोठी कारवाई केली आहे. नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.
गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलानं मोठी कारवाई केली आहे. नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर नक्षल डंप हस्तगत करण्यात आलं आहे. कुरखेडा तालुक्यातील पुराडा हद्दीमध्ये लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई करण्यात आली आहे. आज 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह असणार आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात आहे
गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्र तसेच स्फोटकांचा वापर केला जातो. असे साहित्य ते मोठ्या प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.
25 जुलै रोजी नक्षलविरोधी अभियान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पुराडा हद्दीत राबविले जात होते. यातील लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना मोठे यश आलं आहे.
सदर डंपमध्ये त्यांना कुकर बॉम्ब व इतर दैनंदिन नक्षल साहित्य मिळाले आहे. यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदर डंप हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.