गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सहा पुरुष आणि सात महिलांसह 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस सहायता केंद्राच्या परिसरातल्या पैडी जंगल परिसरात मोठ्या संख्येत नक्षली तेंदूपाने संदर्भातील खंडणी वसूल करण्याकरता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागात एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. आज सकाळी पैडी भागात झालेल्या एका मोठ्या चकमकीत 60 ते 70 नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर गोळीबार सुरू केला. पोलीस दलाने त्याचा जोरदार प्रतिकार केला. यात पोलीस दलाचा दबाव बघता नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळाची चकमकीनंतर पाहणी केल्यावर 13 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. यात सहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनास्थळावरून एके-47- एस एल आर रायफल -303  रायफल, कार्बाइन ,12 बोअर रायफल -मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 


मात्र राज्याचे गृहमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. गृहमंत्री वळसे पाटील यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आढावा घेतला.  त्यांनी या संपूर्ण अभियानाचे कौतुक करत गडचिरोली पोलीस दलाला प्रोत्साहन दिले आहे.  गडचिरोली पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व साहित्य साधनांचा पुरवठा करण्यात येईल अशी माहिती दिली. शेजारील राज्यांशी नक्षल घटना संदर्भात अधिक समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे थेट अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रांवर पोहोचले. 


कटेझरी पोलीस मदत केंद्र हा महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेला पोलीस मदत केंद्र आहे. या भागात नक्षल्यांचा वावर नेहमी असतो आणि घडामोडीही असतात आणि जिल्ह्यात नक्षलविरोधी इतकी मोठी घटना घडली. तरी सुद्धा गृहमंत्री अश्या अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्रला भेट देऊन जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचा मनोबल वाढवला