गडचिरोली: नक्षलवादी कारवायात सामील असणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना इतर प्रकारची मदत करणाऱ्या कट्टर जनमिलिशियास (समर्थकास) गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप मोतीराम पेंदाम (वय 34 वर्षे) असं त्याचं नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यावर 1.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. 


फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास (समर्थकास) अटक केले आहे. 


उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आली. त्याची अधिक सखोल चौकशी असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम (वय 34 वर्षे), रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे आहे. तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा आहे. गेल्या वर्षी 22 मार्च रोजी रोजी नेलगुंडा जंगल परिसरात 1 क्लेमोर व 2 कुकर बॉम स्फोटके लावून सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याच्या कामात त्याचा सहभाग होता. त्या अनुषंगाने उप-पोस्टे  लाहेरी  येथे दाखल आहे गुन्हा अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.


अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती


नाव- दिलीप मोतीराम पेंदाम
- कार्यकाळात केलेले गुन्हे  -01
- सन 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात नेलगुंडा - गोंगवाडा व नेलगुंडा - महाकापाडी जाणा­या पायवाटेवर 01 क्लेमोर व 02 कुकुर बॉम स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. माओवादयांच्या हिंसक कार्यवायांच्या अनुषंगाने इतर दाखल गुन्हयात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.


शासनाने जाहिर केलेले बक्षीस


महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.


गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. 


ही बातमी वाचा :