बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) या अकृतीशील असून गेल्या पाच वर्षात मतदारसंघात त्यांनी काय कामं केली हे लोकांसमोर आणणार असं आव्हान जयंत पाटील यांनी दिलं. प्रीतम मुंडे यांच्यामुळेच बीड जिल्हा मागास राहिल्याचा आरोपही त्यांनी केला. बीडची निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभेसाठी आज अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला जयंत पाटील यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षात बीड लोकसभेत काय झालं, कोणती काम झाली हे जाहीर सभेत सांगणार आहे. बीडच्या या आधीच्या खासदार या अकृतीशील असल्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही, बीड जिल्हा मागासलेला राहिला.  


गेल्या निवडणुकीमध्ये जे नेते आणि आमदार आपल्या सोबत होते ते आता नाहीत, त्यामुळे नवीन नेतृत्वांना संधी देणार असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले. 


पंकजा मुंडे यांच्यावर कुणाचा दबाव माहिती नाही


शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, प्रीतम मुंडे या रेल्वेत बसून फॉर्म भरण्यासाठी येणार होत्या, मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासमोरचं ताट ओढून घेतलं. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता हे त्यांनाच माहीत आहे.


धनंजय मुंडेंनी टीका करताना सबुरीनं घ्यावं


धनंजय मुंडे यांनी देखील माझ्यावर टीका करताना जरा सबुरीनं घ्यावं असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला. ते म्हणाले की, विरोधकांकडून माझ्यावर टीका करताना माझी लायकी काढली जाते. मात्र माझी लायकी काय आहे हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. मी दोन साखर कारखाने चालवतो.गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे 26 कारखाने चालवले त्यापैकी एकही कारखाना आता यांनी शिल्लक ठेवला नाही.


पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे हे स्वार्थासाठी हे एकत्र आले असले तरी यांचे प्रारब्ध बीड जिल्ह्यातील जनताच ठरवेल असं बजरंग सोनवणे म्हणाले. 


ही बातमी वाचा: