गडचिरोली : काल झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्रीचा चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान 29 अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, 26 नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आले. दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. 


Gadchiroli Naxal: गडचिरोलीत पोलीस चकमकीत कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु, गृहमंत्र्यांकडून कौतुक


मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा


दरम्यान या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


ओळख पटलेल्या मृत नक्षलींची नावं


1) अडमा पोडयाम /  पुरुष


2) बंडू उर्फ राजू गोटा / पुरुष 


3) प्रमोद उर्फ दलपत कचलामी / पुरुष


4) कोसा उर्फ मुसाखी / पुरुष


5) चेतन पदा / पुरुष


6) विमला बोगा / महिला


7) किशन उर्फ जैमन / पुरुष


8) जिवा उर्फ दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे / पुरुष 


9) महेश उर्फ शिवाजी गोटा / पुरुष 


10) भगतसिंग उर्फ प्रदीप जाडे / पुरुष


11) सन्नू / पुरुष 


12) प्रकाश उर्फ साधू बोगा / पुरुष


13) लच्छू / पुरुष 


14) नवलू राम दिलीप तुलावी / पुरुष 


15 ) लोकेश उर्फ मंगू पोड्याम / पुरुष


16 ) नेरो / महिला


मिलिंद तेलतुंबडेवर सर्वाधिक 50 लाखांचे बक्षीस 

जे 26 नक्षली मारले गेले आहेत त्यापैकी मिलिंद तेलतुंबडे वर सर्वाधिक 50 लाखांचे बक्षीस होते तर सर्व 26 नक्षली मिळून 1 कोटी 38 लाखांची बक्षीस होते. 


वरील यादीतील प्रमुख नक्षली कमांडर 8 व्या क्रमांकावर असं मिलिंद तेलतुंबडे सेंट्रल कमिटी सदस्य एम एम सी इन्चार्ज होता.


तर 9 व्या क्रमांकाचा महेश उर्फ शिवाजी गोटा कसंसुर दलम डिव्हीसीएम होता...


11 अकराव्या क्रमांकावर चा सन्नू कोवाची कसनसूर दलम चा कमांडर होता


15 व्या क्रमांकाचा लोकेश पोडियम हा कंपनी नंबर 4 चा डीव्हीसीएम होता


तर 6 व्या क्रमांकावर ची विमला बोगा आणि 10 व्या क्रमांकावर चा भगतसिंह जाडे हे दोघे मिलिंद तेलतुंबडेचे खास बॉडीगार्ड होते


पोलिसांनी नक्षल्यांकडून जप्त केलेलं साहित्य


5 एके 47
1 एके 47 (विथ UGBL अटॅचमेंट)
9 एस एल आर 
1 INSAS 
3 थ्री नॉट थ्री
1 पिस्टल
9 12 bore


अशी एकूण 29 हत्यारं ही जप्त केली आहेत.


कोण आहे मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री? 



  • 50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता. 

  • मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.

  • एलगर परिषदेतील फरार आरोपी. 

  • एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.

  • पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी. 

  • जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.

  • एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.

  • अॅंजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती. 

  • मिलिंद हा वणी - राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.

  • शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.

  • शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा कामाचा भाग. त्यामुळे ज्या शेकडो हत्या गेलं दशकभर पोलीस व सामान्य नागरिकांच्या मावोवाद्यांच्या हाती झाल्या त्याला जवाबदार.


आमच्या पोलिसांचा मला अभिमान; गृहमंत्र्यांकडून गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक


गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.  ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६०  दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.