गडचिरोली : उत्तर गडचिरोलीमध्ये गुरुवारी रात्री आणि शुक्रवारच्या सुमारास झालेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये गडचिरोली पोलिसांच्या पथकातील सी-60 तुकडीला मोठं यश मिळालं. तेंदू पत्ता संकलनासाठीच्या बैठकीचं आयोजन नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सीमेनजीकच्या एका गावापाशी केलं होतं. याबातची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकानं ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनेक दशके महाराष्ट्रात रक्ताची होळी खेळणाऱ्या नक्षलवाद्यांचे एक अख्ख दलम संपवण्यात गडचिरोलीत पोलिसांना यश मिळाले आहे. ही  जिगरबाज कामगिरी करत सी 60 (सी सिक्स्टी) कमांडोंनी नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.


सी-60 पथकाची स्थापना कधी झाली?


रात्रीच्या काळोखातील अत्यंत अचूक ऑपरेशनच्या माध्यमातून कसनसूर दलमच्या 13 नक्षलींना कंठस्नान घातल्यावर सी 60 कमांडोंचे वाजत गाजत स्वागत होत आहे.  महाराष्ट्रात 80 च्या दशकाच्या शेवटी शेवटी नक्षलींनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया अशा जिल्ह्यात चांगले पाय रोवले होते. त्यावेळी गडचिरोलीचे एस पी असणाऱ्या के पी रघुवंशी ह्यांनी 1/12/ 1990 मध्ये 60 असे पोलीस जवान निवडले ज्यांना नक्षली परिसराची खडान खडा माहिती होती. ज्यांना नक्षलींची आणि येथील लोकांची भाषा बोलता येत होती आणि ज्यांना त्यांची नस न नस ओळखता येत होती. या तरुण कमांडो फोर्सला सी 60 म्हटल्या गेले. एकेकाळी यांना क्रॅक कमांडो ही म्हणायचे. नंतर 60 चे शेकडो कमांडो झाले पण नाव हे सी 60 चं राहिले. 


सी-60 पथकाला ट्रेनिंग कसं दिल जातं?


सी 60 कमांडोंना खास जंगल युद्धासाठी प्रशिक्षण दिलं जाते.  अतिदुर्गम, पहाडी, संवेदनशील भागांत - ऊन, वारं, पाऊस, दिवस-रात्र येणाऱ्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड देण्यासाठी या सी 60 जवानांना अतिशय खडतर ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम केलं जातं. हैद्राबादच्या ग्रे - हौन्ड्स, मनेसरचे एनएसजी आणि पूर्वांचलच्या आर्मी वॉरफेअर कॅम्प मध्येही यांना खास ट्रेनिंग दिलं जातं. कित्येक तास पाठीवर मृतदेह आणि शस्त्र घेऊन हे कमांडो चालतात. हा त्यांच्या सरावाचा भाग आहे. त्यासह उच्च, विशेष आणि आधुनिक तंत्रज्ञानाचेही ट्रेनिंग देण्यात येते. अनेकांना ही देशसेवा करताना खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे कारण पोलिसात भरती झाल्याच्या रागातून अनेक कमांडोच्या कुटुंबियांना नक्षलवाद्यांनी संपवलेही आहे. 


तसेच सी 60 कमांडोंना अतिदुर्गम, जंगल भागातील गावांमध्ये जाऊन, जिथे इतर अधिकारी जात हि नव्हते अशा ठिकाणी जाऊन लोकांशी सुसंवाद साधून या सी 60 फोर्स ने अगदी वीज, रस्ते, बोरवेल, बस सेवा यांसारखे प्रश्नही सोडवले आहेत. त्याचा फायदा नक्षलींशी युद्धात झाला, कारण लोकांशी आपुलकीचे, आपलेपणाचे नाते जडले आणि नक्षलींची गुप्त माहिती हाती येणे अजून सोपे झाले. अश्याच मिळालेल्या एका गुप्त माहितीवरून गुरुवारी झालेले ऑपरेशन आखले गेले. 


गडचिरोलीत 13 नक्षल्यांना कंठस्नान, गृहमंत्री वळसे पाटलांचा गडचिरोली दौरा, पोलिसांचं केलं कौतुक


गडचिरोलीचे रिअल हिरो



  • कालच्या ऑपरेशनचे हिरो (रोलिंग स्क्रोलमध्ये दाखवता येईल, ज्यांची नावे आहेत त्या प्रत्येकाचे फोटो किंवा व्हिडियो पाठवत आहे)  

  • 12 सी -60 तुकड्याच्या जिगरबाज जवानांनी रात्रीच्या या ऑपरेशनला जंगलात फत्ते केले .  

  • 12 तुकड्यांचे 12 जिगरबाज सब इंस्पेक्टर्स ज्यांनी स्वतः ऑपरेशनमध्ये सामील होत आपापल्या तुकड्यांचे नेतृत्व केले.  

  • उप अधीक्षक (नक्षल अभियान) भाऊसाहेब ढोले ज्यांनी  स्वतःच्या पसंतीने ही जिकिरीची पोस्टिंग घेतली आणि आताच्या सह-असंख्य एन्काउंटर आणि आत्मसमर्पणांना परिणाम दिला.

  • अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल ऑपरेशन्स) म्हणून 24 ऑगस्ट पासून अत्यंत धडाकेदार कारकीर्द निभावत असलेले मनीष कलवानिया ज्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे संपूर्ण ऑपरेशन अचूक योजनाबद्ध केले.

  • गडचिरोली एस पी अंकित गोयल यांनी या ऑपरेशनच्या प्रत्येक टप्प्याच्या प्लांनिंगला अंतिम स्वरूप देत हिरवा कंदील दाखवला.

  • डीआयजी गडचिरोली रेंज संदीप पाटील यांनी गेल्या सहा महिन्याच्या आपल्या सर्व ऑपरेशन्सच्या चुकांचा गोयल आणि कलवानीया यांच्याबरोबर सतत आढावा घेत एक आयडीयल ऑपरेशन कसे असावे याला मूर्त स्वरूप दिले.


बऱ्याच काळापासून चकमक झाली कि 4-6 नक्षल मारण्यात पोलिसांना यश मिळत होते. पण बरेच माववादी पळून जाऊ शकत होते. त्यामुळे प्रत्येक चकमकीनंतर यश जरी हाती आले असले, तरी ते कसे अजून यशस्वी करता येईल याचा अभ्यास हे सर्व अधिकारी गेली अनेक महिने करत होते. ज्याचा परिणाम म्हणजे हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन.