धुळे : एकीकडे कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला आपलेच म्हणवणारे पाठ फिरवत असल्याची अनेक उदाहरणं आपण या काळात पाहिली आहेत. मात्र या काळात माणुसकीचा प्रत्यय दाखवणारी देखील अनेक उदाहरणं समोर आली. आता धुळ्यात तृतीय पंथीयांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत कोरोनाबद्दलची भीती दूर करून किमान आपल्या नातेवाईकांना शेवटच्या क्षणी तरी बेवारस सोडू नका असा संदेश दिला आहे.


धुळे शहरातील जुने धुळे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी तृतीयपंथीय समाजाचे महामंडलेश्वर रवी नाथजोगी तसेच यलम्मा रेणुका देवी मंदिराच्या जोगतींनी स्वतःहून दखल घेत पुढाकार घेऊन मनात कुठल्याही प्रकारची कोरोनाची भीती न बाळगता बाधित मृत व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न घाबरता अंतिम संस्कार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केलं.

मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद उपक्रम, कोरोनाबाधित 800 मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी मदत

यावेळी तृतीयपंथियांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर, महानगर पालिका कर्मचारी भरत येवलेकर, महेंद्र साळवे, रुग्णवाहिकेचे चालक अबू अन्सारी देखील उपस्थित होते.

राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक
राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. काल राज्यात एका दिवसात 12 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. काल राज्यात 12 हजार 822 रुग्णांची नोंद झाली आहे. काल 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 5 लाख 3 हजार 84 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 38 हजार 362 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 275 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 26 लाख 47 हजार 20 नमुन्यांपैकी 5 लाख 3 हजार 84 म्हणजे 19 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 89 हजार 612 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 625 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 67.26 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात काल 275 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.