मुंबई : देशात वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य नागरिक अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जाणे देखील टाळत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील सात मुस्लिम बांधवांनी समाजासमोर एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष शोएब खातीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बंन, अँड. इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटीया यांनी मुंबईसह उपनगरातील तब्बल 800 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहाय्य केलं आहे.


सुरुवातीला सात जणांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला आता मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आणि आता तब्बल या उपक्रमात 200 तरुणांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 500 मुस्लिम आणि 300 हिंदू मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आले नाहीत. कुटुंबीय आले नाहीत. त्याठिकाणी याचं तरुणांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, जव्हार, मोखाडा या ठिकाणांचा समावेश आहे. ज्यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक उपस्थित होते. त्या त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांना पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क देखील या तरुणांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम राबवत असताना कोणतीही जात आणि धर्म मध्ये आलेला नाही. या बांधवांकडून ज्या नागरिकांना अडचणी आल्या त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यात आली आहे.


याबाबत बोलताना बड़ा कब्रस्तानचे सदस्य इक्बाल ममदाणी बोलले की, सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा देखील आकडा वाढत आहे. अनेक नातेवाईक तर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणं देखील टाळत आहेत. या परिस्थितीत बड़ा कब्रस्तानने एक पाऊल पुढे टाकत कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 800 मृतदेहांचा समावेश आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी आम्ही पूर्ण करत आहोत. यासाठी जो आर्थिक खर्च लागत आहे. तो पूर्णपणे बडा कब्रस्तान ही संस्था करत आहे. ज्यावेळी आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली त्यावेळी एक बाब लक्षात आली की, सध्या मोठया प्रमाणात मृतांची संख्या समोर येतं आहे. परंतु मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळतं नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर बड़ा कब्रस्तानच्या वतीने सात जुन्या रुग्णवाहिका दुरुस्त करुन त्या पुन्हा वापरात आणण्यात आल्या. यासाठी लागणारा डिझेल खर्च, ड्रायव्हरचा पगार देखील ' बडा कब्रस्तान' ही संस्था करत आहे. आमची ही सेवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत सुरूच राहणार आहे. सुरुवातील कोरोना होण्याच्या भीतीने अनेकजण आमच्या उपक्रमात सहभागी होण्यास भीत होते परंतु आम्ही त्यांचं योग्य प्रबोधन केल्यानंतर मात्र आता 200 पेक्षा जास्त युवक आमच्या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.


संबंधित बातम्या :