बेळगाव : रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी, नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली.
कोरोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी चार जण लागतात, पण कोरोनाच्या दहशतीमुळे चार लोक देखील येईना झाले आहेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (वय 55 वर्षे) यांचा गुरुवारी (16 जुलै) रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांचे अथणी येथील रुग्णालयाच्या समोर चप्पल दुकान होते.
शुक्रवारी (17 जुलै) सकाळी सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी, नातेवाईक यांना समजली. बातमी समजताच शेजारी, नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दूर उभं राहूनच अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. मृतदेह तिथेच राहिला.
शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली. त्या दुःखी पत्नीने हातगाडीवर मृतदेह उचलून ठेवला. नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही जण त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
कोरोनामुळे शेजारधर्म, नातीगोती, भावनिक बंध देखील लोक विसरत चाललेत हेच खरे. माणुसकी, शेजारधर्म हे शब्द आता केवळ शब्दकोशातच राहिले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी नव्या 95 रुग्णांची नोंद
सलग चौथ्या दिवशी कोरोनाने बेळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून शुक्रवारी 95 कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. याशिवाय चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 789 झाली आहे.आजवर 377 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 391 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण 21 व्यक्तींचा आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.