कोल्हापूर : कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहा:कार माजवला आहे. कोण कुणाला मदत करण्याच्या परिस्थितीत नाही. अनेक ठिकाणी तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं माणुसकी संपत चालली असल्याचं चित्र देखील दिसतं. अशा वेळी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत एक मुस्लीम महिला मृत झालेल्या हिंदू वृद्धाला मुखाग्नी देते. त्यामुळे शाहू महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही विसरलो नसल्याचा संदेश या कृतीतून दाखवून दिलाय.


कोल्हापूरच्या आयेशा राऊत यांनी कोरोनामुळे मृत झालेल्या हिंदू वृद्धावर अंत्यसंस्कार केले. संबधित मृत व्यक्तीच्या कन्येला देखील कोरोनाची लागण झाली होती. कन्येला कोरोनाची लक्षण नसल्यानं त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र वडिलांची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वय वाढलं असल्यानं उपचारांना प्रकृती साथ देत नव्हती. अखेर त्या वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. घरामध्ये दुसरं कुणी नव्हतं त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न सगळ्यांसमोर होता.


कोरोनामुळं निधन झालेल्या वृद्ध व्यक्तीचे पार्थिव पंचगंगा स्मशानभुमीत आणलं गेलं. त्यामुळे मुखाग्नी कुणी द्यायचा हा प्रश्न होता. अशा वेळी आयेशा राऊत यांनी मृत व्यक्तीच्या कन्येला घरामध्ये फोन केला. त्यांच्या कन्येनं देखील वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. पीपीई किट घालून आलेल्या आयेशा यांनी संबधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. आयेशा या मुस्लीम आहेत. मात्र करवीर नगरीत कधीच कुठल्याही धर्मभेदाला थारा दिला नाही. त्याचमुळे आयेशा राऊत यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पाडले.


कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी मृतांची हेळसांड होताना पाहायला मिळत आहे. अनेक नातेवाईक उपस्थित राहण्यास तयार नसतात. रक्षा विसर्जनासाठी देखील अनेक ठिकाणी विरोध होतो आहे. अशा वेळी एका मुस्लीम महिलेनं हिंदू पद्धतीनं केलेले अंत्यसंस्कार ही घटना सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या