नवी दिल्ली : भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.










नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणाले, स्पुटनिक लस भारतात पोहोचली आहे. मला हे सांगण्यात आनंद होत आहे की पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. रशियाकडून मर्यादित प्रमाणात आलेल्या लसीची विक्री येत्या आठवड्यापासून सुरू होईल.''


ते म्हणाले की, एफडीए (FDA) आणि डब्ल्यूएचओ (WHO) ने ज्या कंपनीची लस मंजूर केलेली आहे ती कंपनी भारतात येऊ शकते. आयात परवाना एक ते दोन दिवसात देण्यात येईल. अद्याप कोणतेही आयात परवाने प्रलंबित नाहीत. डॉ व्ही. के. पॉल म्हणाले की, ऑगस्ट ते डिसेंबर या काळात आपल्याकडे आठ लसींचे 216 कोटी डोस असतील.


दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लस नसल्याची तक्रार केली असताना केंद्र सरकारने हे वक्तव्य केले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सध्या स्थगित करण्यात आले आहे.


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, केंद्राने सध्याच्या लसीकरण मोहिमेसाठी कोविड 19 च्या लसीचे 35.6 कोटी डोस खरेदी केले आहेत. याशिवाय16 कोटी डोस (थेट खरेदीद्वारे) राज्य आणि खासगी रुग्णालयांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेत आहेत.


सध्या देशात भारत बायोटेकची कॉवॅक्सिन लस आणि सीरम इन्स्टिट्यूटची कॅविशिल्ड लस देशातील लोकांना दिली जात आहे. लस उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.