गोंदिया : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना या जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. अशातच गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांचा आज कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्या 42 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे गोंदिया जिल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


काल संध्याकाळी सीमा मडावी याना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास आणि निमोनिया झाला असल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य उपचार सुरू होते. मागील आठवड्यात त्यांनी कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र काल पुन्हा चाचणी केली असता, आज त्यांचा मृत्यू झाल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याचे पती देखील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.


सीमा मडावी यांनी 2015 मध्ये पहिल्यादाच राजकारणारात प्रवेश करत गोंदिया तालुक्यातील फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढवित विजय मिळवला होता. जिल्हा परिषद सदस्याचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपताच जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांची जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून निवड झाली. 31 जुलैला जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्या पदमुक्त झाल्या होत्या.