मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्नित महाविद्यालयांत अंतिम वर्षाच्या परीक्षाची तयारी चालू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण संदर्भातील स्थगितीच्या निर्णयामुळे शिक्षण संस्था आणि विद्यापीठांपुढे पदवी प्रवेशाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. या प्रवेश प्रक्रिया पुन्हा घेण्यात याव्यात अशाप्रकारे एक परिपत्रक 11 सप्टेंबर रोजी काढण्यात आले होते. मात्र, राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये यांना उच्च शिक्षण संचालनालयाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे 2020-21 मधील प्रवेशांमध्ये एसईबीसी आरक्षण लागू न करता प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. यामुळे विद्यापीठ महाविद्यालयांची तर धावपळ सुरु झाली आहेच शिवाय प्रवेशित विद्यार्थी आणि पालकांच्या अडचणीत ही वाढ होणार होती. मात्र शनिवारी उशिरा उच्च शिक्षण संचालनालयाकडून हे निर्देश रद्द करण्यात आले असून नवीन निर्देश लवकरच देण्यात येतील असे म्हटले आहे.


मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत पदवी प्रवेशाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. बारावीच्या निकालानंतर सुरु झालेल्या या प्रक्रियेत 3 फेऱ्या होऊन आणखी एक संधी म्हणून चौथी फेरी ही विद्यापीठाकडून राबविण्यात आली आहे. पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महाविद्यालये आणि प्राचार्य अंतिम वर्षाच्या परीक्षेला, ऑनलाईन परीक्षांसाठीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रश्नसंच, विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा आणि निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत कसा लावता येईल अशा सर्व प्रक्रियांमध्ये गुंतले आहेत.


'मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबतच, आंदोलनं करु नका', मुख्यमंत्र्यांचं आवाहन


अशा परिस्थितीमध्ये पुन्हा पदवी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया राबविणे विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापक, महाविद्यालयीन कर्मचारी, प्राचार्य सगळ्यांसाठीच त्रासदायक होणार आहे. दरम्यान एकाच अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन आणि निकालाची प्रक्रिया पूर्ण करताना पदवी प्रवेशाचे आयोजन करणे महाविद्यालये आणि विद्यापीठांना कठीण होणार असल्याने उच्च शिक्षण संचालनालयाकडून तूर्तास पुन्हा पदवी प्रवेशाच्या प्रक्रियेचे परिपत्रक रद्द केले आहे. शासन स्तरावरून यथावकाश नवीन सूचना जारी केल्या जाणार असल्याचे नवीन सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालये, शिक्षण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI