अमरावती : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. कोरोनावर आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं पण शिवसैनिकांकडून माजी सैनिक मदन शर्मांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी बोलणं टाळलं आणि हाच मुद्दा पकडून अमरावतीच्या खासदार चांगल्याच संतापल्या. एक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी एका माजी सैनिकांवर जीवघेणा हल्ला केला. यामुळे सगळीकडे टीकेचा सूर पाहायला मिळाला. त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं नवनीत रवी राणा यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला दिशा दाखवतील व काही दिलासा देतील या अपेक्षेने जनता डोळे लावून बसली होती. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. हा संवाद नव्हता तर केवळ शब्दांचा खेळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक माजी सैनिक मदन शर्मा यांचेवर काही गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी भ्याड हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ करून बेदम मारहाण केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन केले. हा केवळ एका माजी सैनिकवरील हल्ला नव्हता तर देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या, घरदारापासून दूर राहुन देशसेवा करणाऱ्या व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून देशवासीयांची सेवा करणाऱ्या संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा हा अपमान होता व माजी सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता, असं त्या म्हणाल्या.
आजच्या संबोधनात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील किंवा दिलगिरी तरी व्यक्त करतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक शब्दही काढला नाही यावरून त्यांना माजी सैनिकांबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होते. उलट खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे सुद्धा या हल्ल्याला समर्थन होते हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. खासदार नवनीत रवी राणा या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
माजी सैनिक या देशाची शान आहे. राष्ट्राचा स्वाभिमान आहे एक खासदार म्हणून आपण त्यांच्याप्रती कायम आदर बाळगून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे सांगून या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांना 2 तासात जामीन कसा मिळाला? त्यांना सोडणे म्हणजे सैनिकांची थट्टा होय असं समजून या प्रकरणात माजी सैनिकांना न्याय मिळावा म्हणून आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणाची माहिती देणार असून कठोर कार्यवाहीसाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितलेले.
सोबतच लोकसभेत सुद्धा हा प्रश्न मांडून सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील जनतेने ठामपणे माजी सैनिकांचे पाठीशी उभे राहावे व महाराष्ट्रात अराजकता माजली आहे त्यासाठी तमाम महाराष्ट्र वासीयांनी सुद्धा या अन्यायाविरुद्ध एक व्हावे असे आवाहन खासदार नवनीत रवी राणा यांनी केले आहे.