बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आज बहुजन वंचित आघाडीच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीत सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी मागितल्याने बहुजन वंचित आघाडी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगत आणणार अशी चिन्हे पाहायला मिळत आहेत.


बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आज बीड येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकारणी सदस्य किसन चव्हाण, अण्णाराव पाटील, आघाडीचे महासचिव भीमराव दळे, भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे, जिल्हाध्यक्ष विष्णु जाधव, महिला आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृहावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी मिळविण्यात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला मोठे यश आलं होतं आणि म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती ज्या उमेदवारांना प्रस्थापित पक्षामधून उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता वाटते. ही मंडळी बहुजन वंचित आघाडी ते दार ठोठावले शिवाय राहत नाहीत.

केजच्या माजी मंत्री विमल मूंदड़ा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे विधानसभेवर निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत साठे यांचे तिकीट पक्षाने कापले व मुंदड़ा यांच्या सुनबाई नमिता मुंदड़ा लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मुंदड़ा व साठे यांच्यात धुसफुस सुरु होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कांग्रेसने घेतलेल्या मुलाखतीत पक्षाने पुन्हा एकदा नमिता मुंदड़ा यांना हिरवा कंदील देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पृथ्वीराज साठे नाराज होते आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादीकडून वंचित बहुजन विकास अघाड़ीची वाट धरली आहे.

तिकडे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनीही परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली विशेष म्हणजे जिथे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार असताना मराठा नेता अशी ओळख असलेले राजेसाहेब देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी कडे उमेदवारी मागितल्याने परळी विधानसभा मतदारसंघातील लढती मध्ये रंगत येणार हे मात्र नक्की