किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यावर कोणतीच उपाययोजना होत नाही. यामुळे आज किल्लारीकर ग्रामस्थांनी लातूर-उमरगा रस्त्यावर जवळपास दीड तास रास्ता रोको केला.
या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी आपल्या हातामध्ये रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला होता.
पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमच पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. वेळोवेळी आंदोलन, अर्ज आणि विनंत्या करुनही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आज ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.
गावात पाच ते सहा दिवसात एकदा तीन टँकर पाणी येत आहे. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाला अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
आजच्या रास्ता रोकोनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको मागे घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता