शिर्डी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरु झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा आज शिर्डीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे  साईबाबांचं दर्शन घेऊन मुंबईकडे रवाना झाले.


लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावातून जनआशीर्वाद यात्रा सुरु केली होती. आज शिर्डीत या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात दौरा करत आदित्य ठाकरेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.


यात्रेच्या समारोपादरम्यान शिर्डीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. "माझ्यासाठी जनआशीर्वाद ही राजकीय यात्रा नव्हे, तर तीर्थयात्रा आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून समस्यांची निवेदन प्राप्त झाली आहेत, लवकरच ती सोडवणार", असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.



मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार यासाठी प्रार्थना केली का? या प्रश्नाला उत्तर देणे टाळत, तुम्ही अशी प्रार्थना केली तर मला याचा आनंदच होईल, असं म्हणत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी मूकसंमती आदित्य ठाकरेंनी दिली.


"लोकसभा निडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नव्हते, मला त्यांची मनं जिंकायची आहेत. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाला सोबत घेऊन काम करावे लागणार आहे", असं आदित्य ठाकरे यांनी जळगावमध्ये म्हटलं होत. त्यामुळे खरंच आदित्य ठाकरेंनी नागरिकांना मनं जिंकली का? हे आगामी निवडणुकीत दिसेल.


व्हिडीओ पाहा


संबंधित बातम्या