पुणे: महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दोन महिन्यांपासून मराठा मोर्चांची चर्चा आहे. अॅट्रॉसिटी, आरक्षण, शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर मराठा समाज पहिल्यांदा आक्रमक झाला आहे. तोसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनं. सध्याच्या समाजव्यवस्थेत सर्वांना प्रगतीची समान संधी असली पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळंच आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात मागे राहिलेल्या मराठा समाजातील मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. या आणि याच्याशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सोप्या शब्दात त्यांनी आरक्षण आणि इतर प्रश्नाचं विश्लेषण केलं आहे.
'आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा उथळ विचार'

'आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा विचार फारच उथळ आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण की, नियमाला अपवाद म्हणून आरक्षण असतं. घटनेमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे मागासवर्गातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.' असं सावंत म्हणाले

'मराठे मोर्चे ही समाज क्रांतीची नांदी'

'मराठा मोर्चांनी एक आदर्श घालून दिला आहे. या मोर्चांमधून झालेल्या एकजुटीतून क्रांती निर्माण व्हायला हवी. मराठा समाजानं काढलेले मूक मोर्चे आणि तिथं कुणालाही भाषणबाजी करण्यास घातलेली बंदी ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. या मोर्चांकडे मी समाज क्रांतीची नांदी म्हणून पाहतो. त्यामुळे क्रांती फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता ती संपूर्ण भारतात व्हावी अशी माझी इच्छा आहे.' असंही सावंत म्हणाले.
'सर्व जाती सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर याव्यात'

'आपल्याकडील सर्व जाती सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आल्याशिवाय त्यांच्यात बेटी व्यवहार होणार नाही. मागासलेल्या जाती समूहाला पुढारलेल्या जातींच्या पातळीवर आणायला हवं. हा आरक्षणाचा मूळ हेतू आहे.' असं सावंत म्हणाले.

सदोष यंत्रणा सुधारायला हवी

'आरक्षण पुर्नरचेनचा विचार करण्यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, असं करुन चालणार नाही. सर्वात आधी सदोष यंत्रणा सुधारायला हवी. त्यामुळे आरक्षणाच्या पुर्नरचनेचा विचार करता येणार नाही.' असं सावंत यांचं म्हणणं आहे.

'कुठल्याही समाजाचे आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही'

'कुठल्याही समाजाचे प्रश्न हे आरक्षणाने सुटणार नाही. त्यासाठी घटनेला अभिप्रेत असा समाज आपण घडवायला हवा. आपल्याकडे 85 टक्के मागासलेले आहेत. तर 15 टक्के पुढारलेले आहेत.' असं म्हणत सावंत यांनी घटनेला अभिप्रेत असणारा समाज घडविण्याचं आवाहन केलं आहे.

'प्रस्थापितांना आपलं स्थान प्रबळ करायचं असतं'

'समाजात प्रस्थापित लोकांना आपलं स्थान कायमच प्रबळ करायचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या मुद्दयांना खतपाणी घालणं हे ती लोकं सतत करीत असतात.' असा आरोप सावंतांनी केला.

'अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगावर मार्ग काढायला हवा'

'सध्या अॅट्रॉसिटीबाबत बरीच चर्चा सुरु आहे. अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगावर मार्ग काढायला हवा ही गोष्ट खरी आहे. त्यासाठी काही ठोस तरतुदी करणं गरजेचं आहे. आपल्या राज्यकर्त्यांकडून कल्याणकारी राज्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.' असं सावंत म्हणाले.

VIDEO: