सोलापूर : आपल्या देशाला भक्तीची मोठी परंपरा आहे. देवावर असणाऱ्या श्रद्धेमुळे प्रतिमंदिरं उभारण्याची परंपराही आपल्या इथे जुनी आहे. सोलापूरमध्ये याच श्रद्धेतून एक प्रतिमंदिर उभारण्यात आलं आहे.

देवीची प्रसन्न मूर्ती पाहिली, तर कुणालाही आपण कोल्हापुरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेत आहोत, असं वाटेल. पण महालक्ष्मीची ही प्रतिकृती उभी आहे उस्मानाबाद-सोलापूरच्या सीमेवर असलेल्या तामलवाडी गावात. तीसुद्धा तब्बल 2 एकरावर.. हुबेहूब.. काहीही फरक नाही..

सोलापुरातील नामवंत उद्योजक असलेल्या कटारे परिवाराची कोल्हापूरच्या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेतून हे सुंदर मंदीर उभं राहिलं. तुळजापूरच्या भवानीमातेचा दरबार कायम गजबजलेला असतो. त्यात आता तामलवाडी हाकेच्या अंतरावर असल्यानं इथंही भक्तांची रिघ वाढली आहे.

मंदिर जेवढं देखणं, तेवढाच इथला परिसर रम्य आहे. देवीची मूर्तीही पाहताक्षणी डोळ्यात भरते. भक्तीला मोल नसतं... कटारे परिवारानं हे भव्य मंदिर उभारुन त्याची प्रचिती देवीलाही दिली आहे.