मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी ‘शिवसंग्राम’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्षात प्रवेश केला.


सुबोध मोहिते यांचे विदर्भातील सहकारी 9 जूनला शिवसंग्राम पक्षात प्रवेश करतील. खासदार सुबोध मोहिते हे शिवसेना पक्षात असताना केंद्रीय मंत्री होते. त्यांनतर त्यांनी  शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2014 मध्ये त्यांचा रामटेक विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर आज त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला आहे.

काँग्रेस डायरेक्शनलेस पक्ष : सुबोध मोहिते

“प्रत्येक जण पक्ष सोडल्यावर पक्षाला नाव ठेवत आपलं नाव माध्यमात करतो. मला तसं करायचं नाही. मी काँग्रेस पक्षात मनासारखी कामगिरी करू शकलो नाही. प्रत्येक पार्टीचं एक कामाची रणनीती ठरवलेली असते. पण काँग्रेसमध्ये अनेकदा पक्षश्रेष्ठीना भेटून सुद्धा मला योग्य पद, योग्य जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे मला कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडत आहे. काँग्रेस हा डायरेक्शनलेस पक्ष आहे. कुठल्याही गोष्टीत क्लिअॅरीटी नाही. कोणत्या पद्धतीने विरोध करायचा हे काँग्रेस पक्षाला कळत नाही.”, असे सुबोध मोहिते म्हणाले.

“मी आज पक्षात आल्याक्षणी सुबोध मोहितेंना पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देत आहे. शिवसंग्राम समाजसेवेच काम करेल तर भारतीय शिवसंग्राम परिषद पक्ष राजकारणचं काम पाहिल.”, अशी माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली.

मंत्रिपद दिलं नाही म्हणून नाराज नाही, मी भाजपसोबतच : मेटे

“मराठा मोर्चा, आरक्षण या सगळ्यांना नेतृत्वची गरज आहे. त्याशिवाय आपल्या मर्जीने निकाल लागत नसतो. सर्व संघटना एकत्र येऊन कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. मी पूर्णपणे भाजप सोबत आहे. मंत्रिपद दिल नाही म्हणून नाराजी मी आधीच जाहीर केली आहे.”