सांगली: सांगलीची बाजार पेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध. मात्र कोरोनाचा या बाजारपेठेला देखील मोठा फटका बसला असून कोरोनामुळे सांगली बाजार समितीच्या आजपर्यंतच्या इतिहासात हळदीचे लिलाव प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहेत. आज प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन सौदे पार पडतील. हळद सौद्यास दहा दिवसापूर्वी प्रारंभ होणार होता परंतु गर्दीचा धोका लक्षात घेऊन सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ऐन हंगामात सौदे न झाल्यास हळदीचे दर कमी होतील अशी भीती असल्याने हळदीचे उघड पद्धतीने  लिलाव न करता ऑनलाईन लिलाव करणे अत्यावश्यक आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिले होते.


बाजार समितीमध्ये मागील काही  दिवसांपासून हळद आली आहे. सांगली बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचे व्यवहार होत असतात. हळदीचे उघड लिलाव केल्यास सामाजिक अंतर राखले जाऊ शकणार नाही म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती आवारामध्ये उघड पद्धतीने लिलाव करण्यास प्रतिबंध केला होता. या ठिकाणी होणारे हळदीचे लिलाव ऑनलाईन पद्धतीने कराण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या E-NAM (ELECTRONIC NATIONAL AGRICULTURE MARKET) योजनेअंतर्गत सांगली बाजार समितीचा समावेश महाराष्ट्र शासनामार्फत केलेला आहे.



कोणत्याही परिस्थितीमध्ये हळदीचे उघड पद्धतीने  लिलाव होणार नाहीत अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी मागील आठवड्यात दिल्या होत्या.  त्यावेळेपासून सांगली बाजार समितीमध्ये हळदीचे ऑनलाईन लिलाव सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. आडते व व्यापाऱ्यांनी सकारात्मकतेने ऑनलाईन लिलाव पद्धतीने सहभागी होऊन सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले होते. त्यानुसार हळदीचे ऑनलाइन लिलाव आजपासून सुरू झाले आहेत.





हळदीचे ऑनलाईन लिलावाची नेमकी प्रक्रिया कशी असणार?

खरेदीदार आणि अडत्याची नोंदणी होऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळणार

ई - नाम पद्धतीने लिलावात अडत्यांकडून सौद्यातील हळदीची माहिती घेऊन ती ऑनलाईन अपलोड केली जाईल

प्रत्येक हळद मालासाठी बार कोड दिला जाईल

सौदे करण्यासाठी सुमारे तीन तास देण्यात येतील

व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुकानात जाऊन हळद पाहणी करायची आहे

त्यानंतर आपल्या दुकानात येऊन त्या कोड नंबरनुसार दराची ऑनलाईननोंदणी करायची आहे

संध्याकाळी बाजार समितीकडून संबंधित मालाची कोड नंबर नुसार तपासणी केली जाईल

जास्तीत जास्त बोली जाहीर केली जाईल.



त्यानंतर संबंधित अडत्या व्यापाऱ्यांकडून हळद विक्रीबाबत संमती घेतील.  तेव्हाच तो व्यवहार पूर्ण समजला जाईल.