ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांना महापूर आला. महापुरामध्ये विशेषत: नदीकाठच्या पिकांची धुळधाण उडाली. पुरापासून वाचलेली पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. अतिवृष्टी आणि महापुरामुळे सुमारे 70 हजार हेक्टरवरील पिकं कुजून गेली.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
ऑगस्टमधील पुरात झालेलं नुकसान, ज्यात घरं, घरगुती वापराच्या वस्तू, लहान-मोठे उद्योगधंदे, जनावरं याची नुकसानभरपाई पाच नोव्हेंबरपर्यंत सगळ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 90 टक्के रक्कम यापूर्वीच जमा झाली आहे. सर्व तहसीलदार, प्रांतअधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवी.
78 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आणि पंचनामे आम्हाला मिळाले आहेत. त्यानुसार कर्जमाफी आणि प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांना कर्जमाफी, ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेलं नाही, त्यांना विहित नुकसानीच्या तिप्पट नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु आहे. उर्वरित लोकांना प्रत्यक्ष नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. चार ते पाच दिवस लागतील, त्यानंतर त्या त्या बँकांना निर्देश देऊन नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.