मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या तरुण भारत या वृत्तपत्राने शिवसेना प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर नागपूरचा 93 वर्षांची परंपरा लाभलेला तरुण भारत माहित नसेल तर ही बौद्धिक दिवाळखोरी आहे, असे म्हणत राऊतांना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तरुण भारतने संजय राऊतांवर टीका करत असताना उद्धव ठाकरेंवर मात्र अजिबाद टीका केलेली नाही.


तरुण भारतने आग्रलेखामध्ये म्हटले आहे की, "तरुण भारत मला माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल. पण तभा म्हणजे तरुण भारत हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे"

आग्रलेखामध्ये पुढे लिहिले आहे की, प्रत्येक वेळी पक्षप्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका अधिक दृढ व्हावी, असेच त्यांचे वागणे दिसते आहे. राज्यातील जनतेला नुसत्या भाजपचे सरकार नको आहे. त्यांना महायुतीचे सरकार हवे आहे. असे झाले नाही, तर 'विनाशकाले विपरित बुद्धी'चा दोष माथी मारून घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे काहीही उरणार नाही.