मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदांवरून वाद सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जागांच्या वाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करु, यावर दोन्ही पक्षांनी संमती दर्शवली होती. (असा शिवसेनेचा दावा आहे.) त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. ही मागणी भाजपने अमान्य केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 'सामना' या मुखपत्राद्वारे शिवसेना भाजपला लक्ष्य करत आहे. आजच्या 'सामना'मधील आग्रलेखाद्वारे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. 'सामना'मध्ये आज मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'मावळते मुख्यमंत्री' म्हणून केला आहे. "दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची!" असं म्हणत 'सामना'नं फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हटलंय आग्रलेखात?
बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे.
संजय राऊत आणि रामदास कदम 'ती' फाईल का लपवत होते? | मुंबई | ABP Majha
सत्तास्थापनेचे संजय राऊतांचे 'हे' पाच पर्याय | ABP Majha