नवी दिल्ली : दिल्लीत गेली 45 वर्षे फूटपाथवर चहा विकत साहित्य सेवा करणारे लक्ष्मणराव शिरभाते यांना  एक पंचतारांकित ऑफर मिळाली आहे . त्यांच्या जिद्दीची आणि साहित्यसेवेची दखल घेत टी कन्सल्टंट म्हणून एका आलिशान हॉटेलनं त्यांच्याशी करार केला आहे. पण पंचतारांकित सफरीतही  फुटपाथवरची साहित्यसेवा त्यांनी अजूनही सोडलेली नाही.


दिल्लीतल्या आयटीओ परिसरात हिंदी भवनासमोरचा हा फुटपाथ स्टॉल आता सगळ्यांच्याच परिचयाचा झाला आहे. कारण थोडं थोडकं नव्हे तर गेली 45 वर्षे इथं एक चहावाला नित्यनियमानं चहासोबतच साहित्यसेवाही करत आला आहे. लक्ष्मणराव शिरभाते असं त्यांचं नाव आहे. मूळचे ते महाराष्ट्रातले अमरावती जिल्ह्यातले आहे.  सध्या त्यांचं वय 69 आहे. 1975 मध्ये वयाच्या 23 वर्षी ते दिल्लीत आले. म्हणजे  त्यांच्या या जिद्दीची आणि साहित्यसेवेची दखल घेत दिल्लीतल्या शांग्रिला या पंचतारांकित हॉटेलनं त्यांना टी कन्सलटंट म्हणून सन्मानानं सेवेत बोलावलं आहे. त्यामुळे फुटपाथवरुन लक्ष्मणराव थेट पंचतारांकित वातावरणात पोहचले.


माझ्याबद्दल अनेक देशीविदेशी वर्तमानपत्रात छापून आलंय. शांग्रिलाचे मूळ मालक हे विदेशात असतात. त्यांनी ही कहाणी ऐकल्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये या व्यक्तीनं चहा बनवला पाहिजे असं त्यांच्या अधिका-यांना सांगितलं. त्यानंतर या हॉटेलचे लोक मला शोधू लागले. सुरुवातीला तर माझी इच्छा नव्हती हे सोडून जायची. पण त्यांनी आमच्या साहेबांची तु्म्हाला भेटायची खूप इच्छा आहे असं सांगितलं.त्यामुळे मग मी तयार झालो.


 पंचतारांकित ऑफर आली तरी लक्ष्मणरावांच्या स्वभावातला साधेपणा मात्र अजूनही कायम आहे. त्यामुळेच सकाळी 6 ते 12 अशी शांग्रिलातली टी कन्सलटंट ची सेवा केली की दुपारी पुन्हा ते आपल्या पुस्तकांच्या दुनियेत फुटपाथवरच येतात. मला भेटायले येणारे लोक इथेच येतात. हा फूटपाथ हीच माझी ओळख आहे, त्यामुळे तो मी कसा सोडणार असं म्हणत त्यांनी हा दिनक्रम चालू ठेवला आहे. 




 लक्ष्मणरावांनी आत्तापर्यंत 30 पुस्तकं लिहून स्वतः प्रकाशित केली आहे. या वयातही त्यांचा लिहिण्याचा उत्साह कमी झालेला नाहीय. आता ते एक नवं पुस्तक लिहितायत. त्यांच्या दिल्लीत येण्याची प्रेरणाच मूळ पुस्तक होती. पण तेव्हा प्रकाशकानं त्यांना अपमान करुन छापायला नकार दिला. पण काय लिहिलं आहे हे न पाहता केवळ बाह्यरुपावरुनच आपल्याला नकार दिल्यानं लक्ष्मणराव इरेला पेटले आणि त्यांनी पुस्तक स्वता प्रकाशित करायचं ठरवलं. तिथूनच त्यांची साहित्यसेवा सुरु झाली.  


गेल्या काही वर्षात लक्ष्मणरावांच्या जिद्दी साहित्यसेवेची दखल वेगवेगळ्या प्रकारे घेतली गेली आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांना राष्ट्रपती भवनात बोलावून सत्कार करण्यात आला. वेगवेगळ्या स्फूर्तीदायी भाषणांसाठी त्यांना कार्यक्रमात बोलावलं जातं. त्यांची पुस्तकं आता किंडलवरही पोहचली आहेत.  आज पंचतारांकित हॉटेलमध्ये जेव्हा ते चहा बनवत असतात तेव्हा तिथेच त्यांच्या पुस्तकांचंही प्रकाशन लागलेलं असतं. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाच व्हिडिओ काऊंटरवरच झळकत असतो. तो पाहून अनेक सेलिब्रेटी आवर्जून त्यांना भेटायलाही येतात. त्यांचं कौतुक करतात. 


 लेखनाची जिद्द, साहित्यावर प्रेम असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत लेखक बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण करु शकतो याचं लक्ष्मणराव हे मूर्तीमंत उदाहरण आहेत. ही मनोभावे केलेली साहित्यसेवाच त्यांना कुठल्याही वातावरणात त्यांना प्रसन्न ठेवते. त्यामुळेच पंचतारांकित हॉटेल असो की साधा फुटपाथ लक्ष्मणराव तिथं मनापासून पुस्तकांमध्ये रमतात