बेळगावात हनी ट्रॅपमध्ये अकडवून लुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच जणांना अटक
हनी ट्रॅप करुन लुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 16 लाख 500 रोख रक्कम, घड्याळ, व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी उघडकीस आणलेले हनी ट्रॅप प्रकरण ताजे असतानाच बेळगावात आणखी एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आले आहे. हनी ट्रॅप करुन पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोन महिला आणि दोन पुरुषांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. कपड्याचे व्यापारी असणारे एम.एम. मुजावर आणि बीबी आयेशा अब्दुल सत्तार शेख यांच्यात आर्थिक व्यवहार होता.
मुजावर यांना बीबी यांच्याकडून सहा लाख रुपये घ्यायचे होते. मुजावर हे महांतेशनगर स्टेट बँकेत आपल्या व्यवहारासाठी गेले होते. त्यावेळी दोन महिला त्यांच्या कारजवळ येऊन थांबल्या. बँकेतून बाहेर पडताच बीबी आयेशा आणि हिना या दोघींनी मुजावर यांना तुमचे द्यायचे पैसे घरी असल्याचं सांगितलं. घरी चला तुमचे पैसे देतो, असं सांगून मुजावर यांना या दोघींनी घरी नेले. यावेळी घरात अगोदरच दोन व्यक्ती आणि एक अल्पवयीन मुलगा उपस्थित होता.
घरात प्रवेश केल्यावर मुजावर यांना बळजबरीने घरातील व्यक्तींनी नग्न करुन त्यांच्याकडे असलेले 16 हजार 500 रुपये आणि घड्याळ काढून घेतलं. नग्नावस्थेतील मुजावर यांचा व्हिडीओ काढून आम्हाला पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस दाखल करतो. तसेच सोशल मीडियावर तुझा व्हिडीओ व्हायरल करतो, अशीही धमकी मुजावर यांना देण्यात आली.
घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुजावर यांनी, मी आता अडीच लाख रुपये बँकेतून काढून आणून देतो, असं सांगून तेथून सुटका करुन घेतली. तेथून बाहेर पडताच मुजावर यांनी माळमारुती पोलीस स्टेशन गाठलं. तेथे त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांना तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 16 लाख 500 रोख रक्कम, घड्याळ, व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, तीन दुचाकी जप्त केल्या. आलिशान शहाबुद्दीन सय्यद, अखिल अल्लाबक्ष बेपारी, सलमान गुलाज बेग, बीबी आयेशा अब्दुल सतार शेख, हीना अखसर सावनूर अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.