Ratnagiri: जयगड समुद्रात (Jaigad Sea) मासेमारीसाठी गेलेली नावेद 2 ही नौका (Fishing Boat) 26 ऑक्टोबर रोजी  बुडाली. या घटनेला आता एक महिना होत आलाय. या बेपत्ता नौकेचा अद्यापही शोध लागलेला नाही. या बेपत्ता नौकेचा गेल्या महिनाभरात साधा अवशेषही सापडला नाही. नौकेवरील 7 खलाशांपैकी सहा खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्या नौकेचे अवशेष न सापडल्यामुळे जयगड समुद्रात नक्की बोट गायब झाल्यानं मच्छिमार चिंतेत आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत असून त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालाची मच्छिमारांना प्रतिक्षा आहे. 

Continues below advertisement


जयगड येथील नावेद 2 ही मच्छिमार नौका 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली. नौकेशी संपर्क होत नव्हता. बेपत्ता झालेल्या नौकेवर 7 खलाशी होते. त्यांच्यापैकी एका खलाशाचा मृतदेह सापडलाय. उर्वरित सहाजणांचे मृतदेह अद्यापही सापडले नाहीत. बुडालेल्या नौकेचा एक अवशेषही न सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जातोय. समुद्रात वादळ वारा नसताना नावेद नौका बुडाली कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. समुद्रातील मालवाहू जहाजाला धडक बसून अपघात झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत या नौकेचा पुन्हा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. एक महिना उलटत आला तरी मच्छिमार नौकेचा पत्ता न लागल्यामुळं जयगड परिसरातील मच्छिमारांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर जयगड मच्छिमार संस्थेची एक बैठकही नुकतीच पार पडली.


नावेद 2 ही नौका बुडाल्यानंतर अनेक प्रश्न पुढे आले. समुद्रात जाणाऱ्या नौकांची नोंद होत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तात्काळ समुद्रात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व नौकांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले. यासाठी त्यांना टोकन नंबर देण्याची सूचना त्यांनी केली आहे.या टोकन नंबरमुळे कुठली नौका कुठे आहे याचा शोध घेणे सोपे जाणार आहे. जिल्हाधिकान्यांच्या या सूचनेची बंदर विभाग आणि मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कितपत अंमलबजावणी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


जयगडमध्ये बुडालेल्या नौकेचा पोलीस तपास करत आहेत. मी कालच याबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली. त्यांचा तपास अंतिम टप्प्यात आला असन दोन दिवसात ते याबाबत अहवाल देतील, अशी माहिती रत्नागिरीचं जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिलीय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-