St Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून सुरू असलेला तिढा आणखीच वाढत चालला आहे. बुधवारी राज्य सरकार, एसटी महामंडळाने वेतन वाढ जाहीर केली. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेत असल्याची घोषणा आज भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांनाही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, दोघांच्या आवाहनानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. अशातच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या दोघांना एसटी आंदोलनातून आम्ही आझाद करत असल्याचे अॅड. सदावर्ते यांनी म्हटले.

Continues below advertisement


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना संबोधित केले. या वेळी अॅड. सदावर्ते यांनी आमदार पडळकर आणि खोत यांच्यावर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या. बुधवारी, दोन आमदार आणि 9 एसटी कर्मचारी या बैठकीला गेले होते. या बैठकीत कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्यात आला. विलीनीकरणावर शिष्टमंडळ ठाम होते. या शिष्टमंडळाने बाहेर जाण्याचे ठरवले. मात्र, त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप अॅड. सदावर्ते यांनी केला. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे माझ्या घरी दोनदा आले होते. सदाभाऊ खोत माझ्या पाय पडले असे व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. या दोघांना आंदोलनातून मुक्त केले असून मी एकही रुपया न घेता हा लढा लढत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. 


...म्हणून 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणा


अॅड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, एसटी संपात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चात असलेली 'एक मराठा, लाख मराठा' ही घोषणा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अॅड. सदावर्ते यांनी ही घोषणा देण्यामागचे कारण सांगितले. 'एक मराठा, लाख मराठा' ही ताकद देणारी घोषणा आहे. त्यात जात पात येत नाही एकीकरणासाठी दिलेली ही घोषणा आहे, असे अॅड. सदावर्ते यांनी म्हटले. 


भारतीय संविधान दिनी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन


26 नोव्हेंबर हा भारतीय संविधानचा गौरव दिवस आहे. या दिवशी राज्यातील 250 डेपो मध्ये सगळे कष्टकरी आपल्या कुटुंबांसोबत एकत्र येतील आणि भारतीय संविधान आंदोलन परिषद साजरी करतील अशी घोषणा अॅड. सदावर्ते यांनी केली.