वसई : मासे खाणाऱ्यांसाठी एक निराशा देणारी बातमी आहे. वसई आणि आसपासच्या समुद्रात तब्बल दिड महिना मासेमारी बंद राहणारा आहे. तेल आणि वायूचा साठा शोधण्यासाठी ओएनजीसीने या वर्षीही वसईच्या समुद्रात सेस्मिक सर्वेक्षण सुरु केलं आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात संपूर्ण मासेमारी बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारात माशांची आवक घटणार आहे.
वसईच्या समुद्रात हे सर्वेक्षण करताना पाण्यात ब्लास्टसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे माशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज मासे विकत घेणाऱ्या खवय्यांनी गजबजणाऱ्या पाचूबंदर मासळी बाजरात सध्या शुकशुकाट पसरला आहे. मच्छीमारांच्या या बोटी किनाऱ्यावर विसावा खात आहेत. पुढील दीड महिना या बाजारात असाच शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. पण मच्छीमारांना याची कोणतीही भरपाई मिळणार नाही हे विशेष.
ओएनजीसीच्या या मोहिमेला 1जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ओएनजीसीचं हे सर्वेक्षण 25 फेब्रुवारी 2019 पर्यंत चालणार आहे. सर्वेक्षण मोहिमेत समुद्रात फिरतीवर असलेल्या या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छिमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्यांना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याची सूचना मच्छीमार बांधवांना केली आहे. तसेच मच्छीमार बांधवांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सक्त ताकीदही एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मच्छीमारविरुद्ध धोरणामुळे आधीच किनारपट्टीवरचा मच्छीमार संतप्त झालेला असताना या संतापात ओएनजीसीने आता तेलच ओतले आहे. वसई पाठोपाठ पालघर, बोईसर, तारापुर, बडापोखरन आदी गावातील मच्छिमार कुटुंबांसमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. या बंदी काळात मच्छीमार बांधवांचे करोडो रुपयांचे नुकसान शासन कसे भरून देणार? या प्रश्नाहचे उत्तर कुणाकडेही नाही.
वसई आणि पालघरच्या समुद्रात तब्बल दीड महिने मासेमारी बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jan 2019 10:49 PM (IST)
केंद्र आणि राज्य सरकारच्या मच्छीमारविरुद्ध धोरणामुळे आधीच किनारपट्टीवरचा मच्छीमार संतप्त झालेला असताना या संतापात ओएनजीसीने आता तेलच ओतले आहे. वसई पाठोपाठ पालघर, बोईसर, तारापुर, बडापोखरन आदी गावातील मच्छिमार कुटुंबांसमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -