बीड: सततच्या दुष्काळाने गावचा रहाटगाडा मंदावला होता. शेती ओस पाडली होती. बाजारात कमालीची मंदी पसरली होती. मात्र धो-धो बरसणाऱ्या  पावसाने सारेच चित्र पालटलं. शेती बहरु लागल्याने बाजारात तेजी निर्माण झाली. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून अडगळीत पडलेली  मत्स्यबीजची यंत्रणा पुन्हा सुरु झाली आहे.


चार वर्षानंतर माजलगावच धरण भरुन वाहू लागल्यानं, धरणाच्या पायथ्याशी मासेमारांची गर्दी वाढू लागली आहे. कारण, याच धरणाच्या शेजारी शेख बंधू गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्यबीज केंद्र चालवतात. या मत्स्यबीज केंद्रात कटला, रोहू, मिरगाळ या जातीच्या माशांची पैदास केली जाते. या मत्स्यबीज केंद्रातून मराठवाड्यातील अनेक शेतकरी बीज नेऊन, छोटे-छोटे व्यवसाय सुरु करत आहेत.

वीस वर्षांपूर्वी अब्दुल शेख हे मासेमारीसाठी माजलगावचा तलाव ठेक्याने घेत होते, आणि त्यासाठी ते कोलकाताहून मत्स्यबीज आणत होते. नंतर त्यातून मिळणारे उत्पन्न वाढत गेले आणि त्यांना या व्यवसायाची आवड निर्माण झाल्याने, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला एकाच जातीच्या माशांची पैदास ते करायचे. मात्र आता कटला, रोहू, मरगळ यासारख्या वेगवेगळ्या माशांची पैदास या ठिकाणी केली जाते. आज त्यांच्याकडे हे मत्स्यबीज खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी होतं आहे.

दुष्काळाच्या झळा होरपळणाऱ्या मराठवाड्याचे यावर्षीच्या पावसाने नंदनवन झाले. त्यातच शेतीला जोड धंदा म्हणून अनेक शेतकरी आता मत्स्यशेतीकडे वळत आहेत.