पंढरपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळू लागल्याने अशा बालकांवर उपचारासाठी पहिले कोविड हॉस्पिटल पंढरपूरमध्ये सुरु होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय देण्याची भूमिका घेतल्याने आता अशा लहान चिमुरड्यांचा प्रश्न सुटणार आहे. 


कोरोनाचा प्रसार गरोदर महिलांना झाल्यानंतर अनेक बालकांना हा त्रास मातेच्या दुधामुळे होऊ लागल्याचे समोर येत असून यातूनच त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने प्रशासन हैराण झाले होते. पंढरपूर मधील डॉ. शीतल शहा ह्या ज्येष्ठ बालरोग तज्ञ असल्याने त्यांच्याकडे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वारंवार अशा लहान मुलांच्या उपचारांबाबत विचारणा होत होती. यातूनच त्यांनी जिल्हा प्रशासनाला तसा प्रस्ताव दिला होता.


बापाने पेपर टाकून मुलाला इंजिनीअर केलं, चांगली नोकरी मिळाली, साखरपुडाही झाला आणि कोरोनारुपी काळाने त्याला हिरावलं!
       
डॉ. शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅबसह सर्व सुसज्ज उपकरणे आणि मोठा डॉक्टरांचा स्टाफ आहे. सध्या त्यांच्या रुग्णालयात जवळपास 82 लहान मुलांवर उपचार सुरु आहेत. यात नवजात बालकांपासून मुलांचा समावेश असल्याने लहान मुलांमध्ये कोरोना लक्षणे दिसू लागलेले जवळपास 15 रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने त्यांनी निर्णय घेतला नव्हता. आता मात्र मोठ्या संख्येने लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची विचारणा होऊ लागल्यावर त्यांनी शेजारील वेगळ्या इमारतीमध्ये 15 बेडचे सुसज्ज कोविड हॉस्पिटलची तयारी पूर्ण करून आजपासून लहान मुलांवर उपचार सुरु केले आहेत. 


पंढरपूर निकाल हाती येण्यास रात्र होणार, कोविड चाचणीशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश नाही


याच इमारतीमध्ये जरी मागणी वाढत गेली तरी 50 ते 100 बेडची व्यवस्था करायची तयारी डॉक्टरांनी केली आहे. सध्या नवजात बालके आणि लहान मुलांवर कोरोनाचे कोठेच उपचार केले जात नसल्याने डॉ. शहा यांच्या हॉस्पिटलमुळे अशा लहानग्यांचे जीव वाचवणे शक्य होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज किंवा उद्या या हॉस्पिटलला लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटलची मान्यता देणार असल्याचे सांगितले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, पुणे जिल्ह्यातील इंदापूर या भागातील पालक आपल्या कोरोना झालेल्या लहान मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांवर होणारे उपचार हे महात्मा फुले योजनेतून केले जात असल्याने गोरगरीब पालकांना येथे मोफत उपचार शक्य होत आहेत.