नेवासा (अहमदनगर) : क्रिकेट स्पर्धा, बॅडमिंटन आणि रोज सकाळी योगा व प्राणायाम हे चित्र आहे, नेवासा तालुक्यातील कोव्हिड सेंटर मधील. कोरोना झाल्यावर अनेकजण घाबरतात व त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. यावर अनोखा उपाय शोधत नेवासा तालुक्यातील हा पॅटर्न आता राज्यासाठी दिशादर्शक ठरतोय.


नेवासा तालुक्यातील भेंडा येथे शासकीय कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या मानसिक धैर्यासह शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी बॅडमिंटन क्रिकेट यासह इतर खेळ आणि प्राणायामचे धडे देऊन त्यांच्या मनातील दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक दात्यांचे मदतीचे हात या कोविड सेंटरच्या मदतीसाठी सरसावलेले आहे. 


कोविड रुग्णांची मनातील असलेली भीती दूर व्हावी तसेच योग प्राणायामद्वारे त्यांना आत्मिक बळ मिळण्यासाठी त्यांच्याकडून प्राणायाम करून घेतले जात असल्याने रुग्णांची मनातील धडकी दूर झालेली दिसत आहे. उपचार घेताना नवचैतन्य त्यांच्यात येण्यासाठी कोविड सेंटरच्या प्रांगणात कोविड रुग्णांना बॅडमिंटनसह क्रिकेट खेळण्यासाठी देण्यात आलेल्या क्रीडा साहित्यामुळे पुरुष देखील मनसोक्त क्रिकेट खेळत आनंद लुटताना दिसत आहे. महिलाही बॅडमिंटनसह पारंपरिक खेळ खेळून वेगळा आनंद लुटतांना दिसत आहेत. 


कोविड रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी योग प्राणायाम तसेच विविध प्रकारचे खेळ, मन मोकळं करण्यासाठी राबविण्यात आलेले समुपदेशन सत्र असा हा आगळा वेगळा पॅटर्न कोविड रुग्णांसाठी ते बरे होण्यासाठी प्रभावी ठरत आहे. असे प्रयोग राज्यभर रावबिले गेल्यास रुग्णांच्या बरे होण्याच्या संख्येत भर पडेल हे मात्र नक्की.