नाशिक : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे. अनेक रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याचं पहावयास मिळत आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. मात्र तुटवड्यामुळे तेही शक्य होत नसल्याने त्यावर उपाय म्हणून बेन्स सर्किटचा वापर करुन व्हेंटिलेटर प्रमाणेच रुग्णांना ऑक्सिजन मिळत असून त्याचा फायदा रुग्णांना होत असल्याच समोर आलं आहे.


शासकीय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होत असल्याच रोजच पाहण्यात येतं आहे. तर अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना जीव गमावायची वेळ आली. रोजच ऑक्सिजनचा तुटवडा सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना भासत असल्याने मालेगावच्या आणि मनमाड मधिल रुग्णालयात बेन्स सर्किटचा वापर करण्यात येत असून त्यामुळे ऑक्सिजनची बचत होत असल्याचं समोर आलं आहे. 


मालेगावच्या सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर हितेश महाले यांनी ऑक्सिजन बचतीवर हा पर्याय शोधला आहे. हायफ्लो मोडवर व्हेंटिलेटरला मिनिटाला 70 ते 80 लिटर ऑक्सिजनची गरज लागते. तर बायपॅप व्हेंटिलिटरवर 30 लिटर ऑक्सिजनची गरज भासते. मात्र बेन्स सर्किटमुळे मिनिटाला दहा लिटर ऑक्सिजन लागतो. विशेष म्हणजे व्हेंटिलेटरवर 70 ते 80 लिटर वर 14 पर्यंत राहणारी ऑक्सिजन लेव्हल बेन्स सर्किटमुळे कायम राहत असून त्यामुळे रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे रुग्णाला कुठलाही त्रास होत नसल्याचं सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर हितेश महाले यांचं म्हणणे आहे.


अशा प्रकारे बेन्स सर्किंटचा वापर झाल्यास ऑक्सिजनची बचत तर होईलच शिवाय वाया जाणारा ऑक्सिजन सुध्दा त्यामुळे वाचणार आहे.