पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी होत असून यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे मर्यादित 14 टेबलवर ही मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास रात्र होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. शासकीय गोदामात ही मतमोजणी 2 मे रोजी होणार असून प्रशासनाकडून आता याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 


मतमोजणीला येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी केल्याशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याने मतमोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांनाही कोवीड चाचणी करूनच मतमोजणी केंद्रात यावे लागणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. एकाच हॉलमध्ये सोशल डिस्टन्स पालन करून 14 टेबल असणार असून त्यावर प्रत्येकी 4 कर्मचारी बसणार आहेत. डोकेदुखी उमेदवार प्रतिनिधींची असून किमान 300 प्रतिनिधी आणि 160 कर्मचारी हे मतमोजणी कक्षात असणार आहेत. मतमोजणीच्या 38 फेऱ्या होणार असून जय पराजयाचा कल दुपारी 5 पर्यंत मिळण्यास सुरुवात होईल. मात्र, पोस्टल मते व अंतिम निकाल यायला रात्री 9 ते 10 वाजण्याची शक्यता गुरव यांनी बोलून दाखवली. 


यावेळी कोणत्याही कार्यकर्त्याला रस्त्यावर अथवा मतमोजणी केंद्राकडे येता येणार नसून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दर फेरीनंतर निकालाची माहिती येथील पत्रकारांना दिली जाणार असून टीव्ही माध्यमे, रेडिओ अथवा निवडणूक आयोगाच्या अॅपवर निकालाचे अपडेट मिळणार आहेत. या निवडणुकीत 524 मतदान केंद्रावर 2 लाख 34 हजार मतदारांनी केलेले मतदान मशीनद्वारे मोजणार आहे. तर वृद्ध व अपंग मतदारांचे आलेले टपाली मतदान 3289 आणि माजी सैनिकांचे 546 मतदार हेही मोजावे लागणार असून यंदा कोरोनामुळे कमी टेबल असल्याने निकाल हाती येण्यास उशीर होणार आहे. 


पंढरपूर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना आता 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोणालाही मतमोजणी केंद्राजवळ जाऊ दिले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.


मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास आधीच कोरोना स्थिती गंभीर झालेल्या पंढरपूरमध्ये स्थिती अजून खराब होऊ शकते. यासाठी प्रशासन कडक अंमलबजावणी करणार असून मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बेरिगेटिंग करून बंद केली जाणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कोणालाही मतमोजणी केंद्राकडे येऊ दिले जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. मतमोजणी वेळी उमेदवारांच्या कमीतकमी प्रतिनिधींना कोरोनाचे नियम पाळून मतमोजणी केंद्रात सोडले जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी अनावश्यक गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ दिला जाणार नसल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.