कल्याण : अंबरनाथमध्ये लुटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार करण्यात आला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. या गोळीबारात आकाश घोडके हा 19 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.


उल्हासनगरला राहणारा आकाश रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पूर्व भागातील लोकनगरीच्या मैदानात मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. यावेळी अचानक मागून तोंडावर कपडा बांधून आलेल्या एका अज्ञात इसमाने हवेत गोळीबार केला आणि आकाशला त्याच्याकडील चीजवस्तू देण्याची मागणी केली. यावर आकाशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं आकाशच्या हातावर गोळीबार केला. ही गोळी त्याच्या डाव्या हाताच्या तळव्यात जाऊन अडकली.

यानंतर जखमी अवस्थेत आकाशला सर्वप्रथम उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला अंबरनाथमधील श्री सेवा रुग्णालयात आणण्यात आलं. आज सकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन ही गोळी काढण्यात आली. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरु केला आहे.