नागपूर: मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत गाजला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपूर विद्यापीठात आल्या आहेत.


सुमारे दोन लाख उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठाकडून तपासून दिल्या जाणार आहेत.

250 शिक्षक नागपुरातून ऑनस्क्रीन प्रणालीअंतर्गत मूल्यांकन करुन देणार आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आजच मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील असं आश्वासन दिलं आहे.

त्यामुळे नागपुरात आलेल्या 2 लाख उत्तरपत्रिका 5 दिवसात तपासण्यासाठी, 250 पैकी प्रत्येक शिक्षकाला तासाला सुमारे 13 उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. शिक्षकांनी जर 12 तास उत्तर पत्रिका तपासणीचं काम केलं तर तासाला 13 पेपर तपासावे लागतील.

दरम्यान, नागपूरच्या धनवटे नॅशनल आणि शिवाजी सायन्स या दोन कॉलेजमध्ये सध्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरु आहे. आजपासून काम सुरु होणं अपेक्षित आहे, मात्र दुपारपर्यंत कॉम्प्युटरवर शिक्षकच दिसत नव्हते.

मुंबई विद्यापीठाच्या निकालाला भलेही नागपूर विद्यापीठाची मदत घेतली असली, तरी टार्गेट सोपं नाही.

पेपर तपासण्यासाठी सर्व शिक्षक दुपारनंतर येणार. त्यात त्यांना ऑनस्क्रीन प्रणालीची सवय नाही, तिची सवय होण्यास काही दिवस लागू शकतात.

त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला कसे लागणार हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन 

मुंबई विद्यापीठातील घोळावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मौन सोडलं आहे. विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच निकाल लावण्याचं आश्वासन तावडेंनी दिलं.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची हमी विनोद तावडेंनी दिली आहे. कुलसचिवांची बदली राज्य सरकारने नाही, तर केंद्राने केल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली.

आर्ट्सचे निकाल परवापर्यंत लागतील. 61 हजार 992 पेपर तपासायचे बाकी आहेत. कॉमर्सचे पेपर तपासणं कठीण आहे. 3 लाख 75 हजार पेपर बाकी असून दरदिवशी 75 हजार तपासायचं आवाहन आहे.  लॉ विषयाच्या  40 हजार उत्तरपत्रिका असून लॉ आणि मॅनेजमेंटला शिक्षक मिळत नसल्याचंही तावडे म्हणाले.

एकूण उत्तरपत्रिका – 17 लाख 68 हजार 441
तपासलेल्या उत्तरपत्रिका – 12 लाख 48 हजार 492
तपासण्यास बाकी – 5 लाख 19 हजार 949

मुंबई विद्यापीठात मंगळवारच्या दिवसात 1 लाख 30 हजार पेपर तपासून झाले, 5 हजार 30 शिक्षकांकडून पेपर चेकिंग झाल्याची माहिती आहे.

मुंबई विद्यापीठा अंतर्गत 1984 मध्ये 80 महाविद्यालयं होती. तेव्हा परीक्षा विभाग जेवढा होता, तितकाच अजूनही आहे. मात्र 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्याची जबाबदारी शासन म्हणून स्वीकारतो, असं तावडे म्हणाले.