औरंगाबाद: कोपर्डी बलात्कार पीडितेच्या स्मारकावरुन संभाजी ब्रिगेडच्या निशाण्यावर असलेल्या भय्यू महाराज यांनी अखेर मौन सोडलं आहे.

भय्यू महाराज यांनी संभाजी ब्रिगेडवर हल्ला चढवला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत भय्यू महाराजांनी अनेक मुद्दयांना स्पर्श केला.

प्रश्न: कोपर्डी पीडित स्मारक आणि वादाबाबत आपलं काय म्हणणं आहे?

उत्तर : एबीपी माझाने वाद सुरु होण्यापूर्वीच माझी प्रतिक्रिया घेतली होती. त्यावेळीच मी स्पष्ट आणि ठामपणे सांगितलं होतं, की स्मारकाची इच्छा पीडित कुटुंबाची होती. वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तिथे काही तरी व्हावं, काही आठवण राहावी ही इच्छा होती. मग मी त्यांना (पीडित कुटुंबाला) सल्ला दिला, की हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे, तुम्ही घरगुती कार्यक्रम करुन टाका.

घरगुती कार्यक्रम करत असताना, मी त्यावेळीही एबीपी माझाशी स्पष्ट बोललो होतो, की हे एक व्यक्तीशा नसून, नारीला आत्मीक स्वातंत्र्य, निर्णय घेण्याची क्षमता कशी निर्माण व्हावी त्यासाठी हे स्थान समजून घ्यावं. त्यामध्ये स्मारक, छत्री किंवा एखाद्या व्यक्तीविषयी काही येत नाही. दुसरी गोष्ट की ते जवळ जाऊन तुम्ही बघा, पीडितेचा पुतळाच नाही. तो सर्वसामान्य, प्रतिकात्मक चेहरा होता. समाजातील संवेदनशीलता जागृत राहावी हा त्यामागचा हेतू होता.  सर्व समाजातील माता-भगिनी यांच्यावरील अन्यायाविरोधात ते स्मारक समर्पित होतं. मात्र त्याला वेगळं वळण दिलं गेलं.  त्यातून वाद कसा निर्माण झाला हे कळलं नाही.

प्रश्न:  या वादामुळे तुम्ही दु:खी आहात?

उत्तर:  दु:ख असं नाही, संतांनी म्हणावं संतही म्हणून घ्यावं, उन्हात फिरणार तर चटके तर लागणार.  चटके लागले तरी हरकत नसते.

प्रश्न: समजून घ्यायला जे विरोध करत आहेत ते कमी पडले?

उत्तर : तो त्यांनी विचार करावा. यापूर्वी मी संभाजी महाराजांचा पुतळा बांधला होता, तेव्हा का विरोध केला नाही? 21 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा तुळजापूरला उभा आहे. तो सर्वांसमोर आहे. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांपासून सर्वजण आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शांचा ठेवा सर्वांपर्यंत जायला पाहिजे. तर तेव्हा आम्ही पुतळा उभा केला, तेव्हा आक्षेप का घेतला नाही?

कोपर्डीतील पुतळा हा पुतळा नाही, ती कुटुंबाची भावना आहे, व्यक्तीगत आहे. कुणीही आपल्या आई-वडिलांची समाधी बांधतोच. कोणी आपल्या बहिणीची समाधी बांधतो, मी माझ्या वडिलांची समाधी बांधली. मध्ये आमची मंडळी (पत्नी) गेली, त्यांची समाधी बांधली. तुम्ही येऊन बघू शकता. वेगळं असं काय?

त्यांच्या भावना होत्या,  त्यांच्या भावनेला उलट मी व्यवस्थीत पद्धतीने वाद होऊ नये म्हणून शिथील केलं.

www.abpmajha.in

प्रश्न: या सर्व घटनेनंतर मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले. आता 9 ऑगस्टलाही मोर्चा होणार आहे. मराठा मोर्चाशी तुमचं नाव जोडलं जातं. मराठा मोर्चा आणि भय्यू महाराज काय समीकरण आहे?

उत्तर : अहो मला कुठलंही श्रेय घ्यायचा शौक नाही. मी 15 लाख स्कॉलरशीप दिली, आजपर्यंत नाव नाही. 30 लाख झाडं लावली, 1700 च्या वर तलावं निर्माण केली. पण कुठलंही श्रेय घेतलं नाही.

कोणतं समाजकार्य करताना श्रेय घेतलं नाही. अण्णा आंदोलनाच्यावेळी माझ्या तोंडातून कुठला शब्द फुटला? मोदीजींचा सदभावना उपवास सोडताना माझ्या तोंडातून कोणता शब्द फुटला? तर मी मोर्चाचं श्रेय कशाला घेत बसणार? माझं सरळ म्हणणं आहे की मला राष्ट्रसमाज आणि मानवतेसमोर जी आव्हानं आहेत, त्यासाठी नीटनेटकेपणे कार्य करु दे, मला कुठल्याही वादामध्ये खेचण्याचा प्रयत्न करु नका.

प्रश्न - समीकरण काय आहे?

उत्तर – जे मांडत आहेत, ते सांगतील समीकरण काय आहे.. मी मांडतच नाही, तर मी कसं सांगू?

प्रश्न – 9 तारखेच्या मुंबईतील मराठी मोर्चाला पाठिंबा आहे?

उत्तर – मला माहितच नाही की 9 तारखेला मोर्चा आहे. मी बुंदेलखंडमध्ये होतो, त्यामुळे मोर्चाबाबत मला माहितच नाही.

प्रश्न – मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय?

सर्व आरक्षणाबाबत एकच आहे की, ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर, सोशल इकॉनॉमिकल स्टेटसचा सर्व्हे झाला का? यूएनओच्या सूचकांप्रमाणे किती जाती वर गेल्या, किती खाली आल्या? तिसरं म्हणजे आर्टिकल 15-16 मध्ये संशोधन प्रक्रिया कशी राहिली? बेसिकली आपल्याला प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे. लेट द सर्व्हे शूड हॅपन फर्स्ट,  त्यानंतर आमच्यासारख्या लोकांनी भाष्य केलं तर बरं होईल.

प्रश्न : तुमची काय भूमिका आहे?

उत्तर : माझी काय भूमिका? मी सर्वांना छात्रवृत्ती वाटतो. फूटपाथवर, वीटभट्टी, सफाई करणारे वगैरे ज्यांना ज्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांना सर्वांना शिक्षण मिळायला हवं.

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजेंना अटक झाली, तुमचं काय मत?

उत्तर : उदयनमहाराज आणि मी जीवलग मित्र आहोत. त्यांचं दु:ख आणि त्यांची वेदना किंवा त्यांच्याप्रती काहीही असेल, तर मी त्यांच्यासोबत आहे.

प्रश्न: तुम्हाला वाटतंय त्यांच्यावर अन्याय होतोय?

उत्तर : राजे आहेत, 2 लाखांची खंडणी कशाला मागतील? पण कसंय, तुमचं माझं चरित्र ती लोकं लिहितात, ज्यांचं स्वत:चं चरित्र नसतं.

www.abpmajha.in

VIDEO: