सातारा : साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तीन दिवसांपूर्वी (18 डिसेंबर) आंदोलन करुन पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. या आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्या 80 कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


पुणे-बंगळुरु महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम दिलेला असूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक होऊन आंदोलन केले. तसेच त्यांनी आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?
पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ आनेवाडी येथे हा टोलनाका आहे. पुणे साताऱ्यादरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्याचबरोबर या महामार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. टोल प्रशासनाकडूनही कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. प्रसाधनगृहांअभावी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे, असे दावे शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.


एकीकडे प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र दुसऱ्या बाजूला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. त्यामुळे 15 दिवसांच्या आत प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवा, खड्डे बुजवा नाहीतर टोल बंद पाडू असा अल्टिमेटम शिवेंद्रराजेंनी 15 दिवसांपूर्वी दिला होता. परंतु 15 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही कार्यवाहा केली नाही. परिणामी शिवेंद्रराजेंना आंदोलन करावे लागले.


शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करुन टोलनाका बंद पाडला. तसेच लवकरात लवकर प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत, तर पुढील आंदोलन हे खळ्ळखट्याक मार्गाने केले जाईल, असा इशारादेखील शिवेंद्रराजेंनी दिला होता.


आंदोलनाबाबत शिवेंद्रराजे काय म्हणाले?
शिवेंद्रराजे यांनी यावेळी एबीपी माझाशी बातचित केली. शिवेंद्रराजे म्हणाले की, आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खड्डेमुक्त झालेले हवे आहेत. महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था हवी. महामार्गावर रुग्णवाहिका आणि टोईंग व्हॅनची व्यवस्था असावी. त्याचबरोबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये करार करताना ज्या काही सोयी सुविधा देण्याचा करार झाला आहे. त्या सर्व सोयी सुविधा प्रवाशांना मिळायला हव्यात. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खळ्ळखट्याक आंदोलन होईल.


व्हिडीओ पाहा