सांगली : ग्रामपंचायत असो अथवा महानगरपालिका या संस्थांसमोर कर वसुलीचं नेहमीच मोठं आव्हान असतं. शंभर टक्के कर वसुली करणं तर ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांना कधीच शक्य होत नाही. याचा थेट परिणाम हा स्थानिक विकास कामावर होत असतो. यात दरवर्षी कित्येक लाखाचा कर वसूल होत नाही आणि या करावर पाणी सोडावे लागते. मात्र सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त कर वसूल व्हावा यासाठी अशी हटके योजना राबवली आहे. यामळे गावातील प्रत्येक जण आपला कर भरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कडेगाव तालुक्यातील वांगी गाव हे 9 हजारच्या आसपास लोकसंख्यचे गाव. तसं तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचं हे गाव. जसं गाव मोठं तसं गावच्या टॅक्सचा आकडा देखील मोठा. या ग्रामपंचायतीसमोर थकबाकीचे मोठे आव्हान आहे. या गावची दरवर्षी एकूण 65 लाखाच्या आसपास करवसुली असते. मात्र कितीही प्रयत्न केले तर 30 टक्केच करवसुली होते. गावात एकूण 2600 खातेदार, पण प्रत्येकजण थकबाकी भरेलच असे नाही. ज्यांनी कर भरला नाही त्याचे नळ कनेक्शन तोडले, गाळे सील केले तरी काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लोकांनां कर भरण्यासाठी फार जबरदस्ती करायला लागू नये आणि स्वखुशीने लोकांनी आपली पाणीपट्टी, घरपट्टी, भरावी यासाठी अशी एक योजना सुरू करण्याचे ठरवले आणि यातून उदयास आली ती करवसुली सुवर्ण बक्षीस योजना.
वांगी ग्रामपंचायतीने गावातील 2600 खातेदारांना ही योजना लागू केली आहे. जे घरपट्टी, पाणीपट्टी भरतील त्याचा या योजनेत समावेश होणार आहे. 'कर वसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना' या नावाने ही बक्षीस योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी एकूण तीन बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. पाहिले बक्षिस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, तर दुसरे बक्षिस तीन ग्रॅम सोन्याची अंगठी आणि तृतीय बक्षीस दोन ग्रॅम सोन्याची अंगठी असे आहे. सन 2019 - 20 या वर्षापासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणारे खातेदार या योजनेत भाग घेऊ शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच ,सदस्य आणि कर्मचाऱ्यांना या योजनेत भाग घेता येणार नाही असेही ग्रामपंचायतीने जाहीर केलं आहे.
या योजनेची शेवटची तारीख ही 15 मार्च 2020 पर्यंत राहील. या तारखेनंतर कर भरणाऱ्या खातेदारांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. 15 मार्च 2020 अखेर संपूर्ण करणाऱ्या खातेदारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील खातेदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येईल. नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या लकी ड्रॉ बॉक्समध्ये ठेवण्यात येतील. लहान मुलांकरवी तीन चिठ्ठ्या उचलण्यात येतील. हा लकी ड्रॉ विशेष ग्रामसभेचे आयोजन करून इन कॅमेरा काढण्यात येईल असे ग्रामपंचायत वांगीकडून प्रकटन नोटीसद्वारे जाहीर करण्यात आले आहे. अनोखी योजना ग्रामपंचयायतीने राबवल्याने पंचक्रोशीसह तालुक्यात सर्वत्र याच योजनेची चर्चा दिसून येत आहे. याशिवाय ही योजना दरवर्षी ठेवणार असल्याचे देखील ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे.
टॅक्स वसुलीसाठी भन्नाट डोकॅलिटी, टॅक्स भरा आणि लकी ड्रॉ मधून सोन्याची अंगठी मिळवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2019 11:52 PM (IST)
ग्रामपंचायतीने गावातील 2600 खातेदारांना ही योजना लागू केली आहे. जे घरपट्टी, पाणीपट्टी भरतील त्याचा या योजनेत समावेश होणार आहे. 'कर वसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना' या नावाने ही बक्षीस योजना राबवली जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -