Amruta Fadnavis : भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये नवी मुंबईतील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली होती. गावडे यांनीभाषण करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख ‘ डान्सबार’ वाली असा केला होता. त्याचबरोबर त्यांची अक्कल ही काढली होती. याप्रकरणी भाजपा आक्रमक झाले होते. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शनिवारी वाशी पोलीस ठाण्यात दोघांनी हजेरी लावत जोपर्यंत गावडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा बघून वाशी पोलीसांनी अशोक गावडे यांच्या विरोधात कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी वाशी येथे महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी अशोक गावडे यांनी आपत्तीजनक वक्तव्य केले. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कधीही रस्त्यावर येऊन बोलेल्या नाही. मात्र ही डान्सबारमधून आलेली रस्त्यावर येत बोलत आहे. अशा अक्कल नसलेल्यांच्या मागे जावू नका, असे वक्तव्य अशोक गावडे यांनी भाषणावेळी केले होते. गावडे यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा मागणी केली. त्यानुसार वाशी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चित्रा वाघ यांचा संताप -
या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला. राष्ट्रवादी नवीमुंबईचा हरामखोर जिल्हाध्यक्ष अशोक गावडे सार्वजनिक ठिकाणी विरोधीपक्ष नेत्याच्या पत्नीचा आक्षेपार्ह उल्लेख करतो..हे वक्तव्य राज्यात घरोघरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहोचलं ही बदनामी नाही ?? तरीहीया FIR मध्ये 509 सोबत ITsection लावले नाहीत. अजून किती बगलबच्च्यांना वाचवणार आहात. वैजापूर-सेनेच्या आमदाराला अजामिनपात्र गुन्हा असतांनाही जामिनपात्र करून बाहेर काढले. शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिकने एका मुलीवर बलात्कार जबरदस्तीने गर्भपातचे सगळे पुरावे देऊनही जामिनावर बाहेर. राज्यातील महिलांचे तळतळाट या सरकारला भोवल्याशिवाय रहाणार नाही.