मुंबई: मराठी टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचं आहे, मराठी बोलताना लाज वाटायची गरज नाही असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते एबीपी माझाच्या अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले की, "भाषा टिकवायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनीच मराठी बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या भाषेत अडकला तर तुम्ही जागतिक स्तरावर स्पर्धा करु शकणार नाही असं जे बोलतात ते चुकीचं आहे. महात्मा गांधी, टागोर त्यांच्या मातृभाषेत बोलत होते. भाषा टिकवण्यासाठी आधी मराठीत बोललं पाहिजे, आपल्या भाषेची लाज वाटायला नको."


मराठी भाषा ही जगामधील दहावी भाषा आहे. तर मग ती अशीच मरणार नाही. आपली भाषा आपण बोलताना इतर भाषांतील काही शब्द आणले तर ती अधिक समृद्ध होते असं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राला अनेक क्षेत्रांमध्ये समृद्ध इतिहास आहे. सर्वच बाबतीत महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्राचा डीएनए हा वेगळाच आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आपण विसरलो आहे ही खंत वाटते. महाराष्ट्र असा प्रदेश आहे त्यामध्ये सर्व प्रवाह आहेत."


राजकारण्यांनी संस्कार करायला हवेत
राजकारण्यांनी आपल्या मातृभाषेची जपणूक कशी करावी याचं उदाहरण देताना राज ठाकरे म्हणाले की, "ममता बॅनर्जीना भेटायला मंत्रालयात गेल्यावर लिफ्टमधून जाताना किशोर कुमारांची बंगाली भाषेतील गाणी ऐकू आली. राजकारण्यांनी संस्कार करायला हवी. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांच्या कानावर मराठी पडावी याची तजविज केली पाहिजे. "


संबंधित बातम्या: