Buldhana News बुलढाणा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांशी अरेरावी करणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या खेर्डा येथील तलाठ्याला भोवले आहे. या गैरप्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दोषी तलाठ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे.
काल, 2 जुलैला जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा गावात तलाठ्याने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज देण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरुषांशी अरेरावी करत कार्यालय बंद करून तिथून निघून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, आज देखील हे कार्यालय बंद असल्याने खेर्डा येथील लाडकी बहीण योजनेसाठी कामकाज ठप्प होते. परिणामी येथे मोठी गर्दी उसळली असून जमलेल्या महिलांनी रोष व्यक्त केला होता. याबाबतची बातमी एबीपी माझा ने लावून धरल्यानंतर या गैरप्रकारची दखल मुख्यमंत्र्यांनी घेत दोषी तलाठ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या असून जिल्ह्यातील तलाठी, प्रांत अधिकारी, तहसीलदारसह इतर सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहकार्य मिळावं, या उदात्त हेतूने आम्ही ही योजना सुरू केली आहे. लाभार्थी महिलांना वर्षाकाठी 18 हजार रुपये वर्षाला आर्थिक सहाय्य मिळावं, असा व्यापक विचार ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सोबतच महिलांसाठी अतिशय आवश्यक असलेल्या गॅस सिलेंडर हे वर्षाला तीन सिलेंडर देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या दोन्ही योजना आम्ही अतिशय जिव्हाळ्या पोटी केल्या आहेत. त्यामुळे या योजनांमध्ये शासन अतिशय आत्मीयतेने काम करत आहे. त्यातील लाभ प्रत्यक्ष महिलांना मिळावा अशी शासनाची मनीषा आहे. मात्र, त्यात लाभार्थ्यांची कुठलीही गैरसोय अथवा आर्थिक लूट होऊ नये, असे केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्याला दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिलीय.
तलाठ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप करत गावकऱ्यांचा अभूतपूर्व गोंधळ
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र जमवण्यासाठी ग्रामीण भागात महिलांची मोठी धावपळ बघायला मिळत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील तलाठी हा महिलांची आरवी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याची बातमी एबीपी माझाने दाखवताच खेर्डा या ठिकाणी जळगाव जामोद तहसीलदार शितल सोलाट या पोहोचल्या. मात्र तहसीलदार पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने या ठिकाणी तलाठी पोहोचले आणि कार्यालय उघडलं. मात्र कार्यालय उघडतात जमलेल्या नागरिकांनी या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ घातला.
तलाठ्यांनी प्रत्येक व्यक्तीकडून काल तीस ते शंभर रुपये घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी तलाठी आणि तहसीलदारांना धारेवर धरलं. हा सर्व प्रकार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र माध्यमांचा कॅमेरा हे सर्व रेकॉर्ड करत असल्याचे बघून तहसीलदार शितल सोलाट यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ महिला आणि पुरुषांनी या ठिकाणी गोंधळ घालत तलाठ्याने पैसे घेतल्याचा आरोप करत मोठ्या गोंधळ घातला.
महत्वाच्या बातम्या
- लाडक्या बहिणींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना