रत्नागिरी : जिल्ह्यातील जयगड बंदर, नेहमीप्रमाणे बंदरावर राबता सुरू होता. मच्छिमारीला जाण्याची बोटींची घाई सुरू होती. त्यामध्ये होती ती नावेद-2 ही देखील बोट. जवळपास सहा खलाशी घेऊन हि बोट 26 ऑक्टोबरला समुद्रात मासेमारीकरता गेली. पण, मध्यरात्रीनंतर मात्र बोटीशी संपर्क तुटल्याची, बोट गायब असल्याची बाब समोर आली. सहा खलाशांसह जवळपास 20 ते 22 नॉटिकल मैल अंतरावर हि बोट मासेमारी करत होती. त्यानंतर तातडीनं सुत्र हलली आणि कोस्टगार्ड, पोलिसांनी बोट आणि त्यावरील खलाशांकरता शोध मोहिम राबवली. पण, 15 दिवसानंतर देखील केवळ एका खलाशांचा मृतदेह सोडता काहीही हाती लागलं नाही. 


समुद्रात दूरवर बोटीवरील एक आईस बॉक्स आढळल्याचं काही मच्छिमाराचं म्हणणं आहे. दरम्यान, 15 दिवसानंतर देखील पोलीस आणि कोस्टगार्डच्या मदतीनं बेपत्ता बोटीचा शोध सुरू आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या मंगळवारी अर्थात कालच्या पत्रकार परिषदेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'बोटीचा शोध सुरू आहे. आम्ही कोस्टगार्डला आणखी 72 तास शोध घ्या' अशी विनंती केली असून त्यांनी ती मान्य केल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किंवा स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बोटीला एखाद्या मालवाहू बोटीनं धडक दिल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. पण, याबाबत अद्याप तरी ठोस पुरावे किंवा अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. 


एका व्हिडीओनं आशा मावळली
15 दिवसानंतर का असेना पण मच्छिमार सुरक्षित असतील, त्यांचा शोध लागेल, बोटीचा पत्ता लागेल ही आशा होती. पण, ती देखील मावळली आहे. कारण सध्या एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसत आहे. पोलिसांची पेट्रोलिंग बोट सदर मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मृतदेह पूर्णता कुजल्यानं त्यामध्ये देखील अपयश येत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत आम्ही काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'सदर व्हिडीओ हा 1 किंवा 2 नोव्हेंबरचा आहे. दाभोळ भागातील पेट्रोलिंग बोट जवळपास 20 ते 22 नॉटिकल मैलावर शोध घेत होती. त्यावेळी त्यांच्या नजरेस हा मृतदेह आढळून आला. पण, मृतदेह कुजलेला असल्यानं त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पूर्णता फसला. यावेळी आम्ही मच्छिमारांना देखील मदतीसाठी बोलावलं. पण, कुणीही पुढं आलेलं नाही. या ठिकाणी आम्ही कुणाशीही संपर्क साधू शकत नव्हतो. म्हणून काही अंतर मागे येत आम्ही यंत्रणांशी संपर्क साधत परत मृतदेह असलेल्या ठिकाणी गेलो. पण, त्यावेळी मृतदेह मात्र दिसून आला नाही.' अशी प्रकारची वस्तुस्थिती असल्याचं सांगितलं. 


आता पुढं काय?
गायब झालेल्या बोटीवरील खलाशी हेच घरचे कमवते होते. हातावरचं त्याचं पोट. पण, आता कमवते हात गेल्यानं करायचं काय? हा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. दरम्यान, यामध्ये आता अधिक वेळ न घालवता बेपत्ता खलाशांना मृत घोषित करा आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता मच्छिमार करत आहेत.


संबंधित बातम्या :