सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी समुद्रकिनाऱ्यावर सुमारे पाच किलो वजनाची कोट्यावधी रुपये किंमतीची देव माशाची उलटी मच्छिमार उमाकांत विठ्ठल कुबल यांना आढळली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगड येथे येत उलटी ताब्यात घेतली. बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे. तसेच या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.            

  
देवगड शिवनगर येथे राहत असलेले उमाकांत कुबल हे सकाळी मासेमारी करण्यासाठी तारामुंबरी समुद्रकिनारी  गेले असता त्यांना स्मशानभूमी नदीच्या किनाऱ्यावर एक विशिष्ट पदार्थ दिसून आला. सदर पदार्थ कुत्रे खात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत कुत्र्यांना घालवून तो पदार्थ जवळून पाहिला असता चिकट प्रमाणात असून प्रथमच किनारपट्टी भागावर पाहिल्याचे त्यांना आढळल्याने सदर पदार्थ वेगळ्याच प्रकारचा असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रथम त्याचे फोटो काढून त्यांचे मित्र जे मुंबई येथे मत्स्य संशोधन संस्थेत काम करतात त्यांना व्हॉट्सअॅप वर पाठवले. 


तांडेल यांनी फोटो पाहिल्यानंतर तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे कुबल यांना सांगितले. या उलटीला कोट्यावधीची किंमत आहे. या उलटीची तस्करी केली जाते. त्यामुळे याची माहिती वनविभागाला द्या अशीही सूचना दिली. त्यानुसार तांडेल यांनी कणकवली वनविभागाला याची माहिती देऊन कुबल यांचा संपर्क क्रमांक दिला कुबल यांनी तो पदार्थ एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून वनविभागाच्या ताब्यात दिला. उलटी सदृश्य पदार्थाचा पंचनामा करून सदर उलटी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. 


कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, ठाकूरवाडी वनरक्षक रानबा चिक्कड ,अनिल राख, लिपिक संतोष आगचेकर यांनी उमाकांत कुबल यांचेशी संपर्क साधत रीतसर पंचनामा केला. वन विभागाने या पदार्थाचे वजन केले असता हा पदार्थ पाच किलो वजनाचा होता. हा पदार्थ वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. प्रथम दर्शनी हा पदार्थ व्हेल माशाच्या उलटीसारखा दिसत असून याची शहानिशा करण्यासाठी याची तपासणी करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल भुणकीकर यांनी सांगितले.
  
आंतरराष्ट्रीय बाजारात अशा पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याची किंमत करोडो रुपयात असते व छुप्या मार्गाने व्हेल माश्याची उलटीची तस्करी केली जाते.