पालघर : पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात सध्या भातपेरणीचा मोसम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठीची लगबग सुरू आहे. मात्र, पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वाडा तालुक्यातील सापणे बु. गावातील शेतकरी संजय तुकाराम भोईर यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान(एसआरटी) पद्धतीने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. संजय भोईर यांनी आपल्या शेतात मागील वर्षांपासून हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ते त्यात यशस्वी झाल्याने त्यांनी या वर्षी आपल्या चार ते साडेचार एकरच्या पूर्ण शेतीमध्ये एसआरटी पद्धतीने लागवड केली आहे. त्यांनी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व भट लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे.
एसआरटी पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी संजय भोईर यांनी दोन लोखंडाचे सांगाडे तयार केले आहेत. पहिल्यांदा ट्रॅक्टरने पूर्ण शेतीची उखळणी केल्यानंतर त्यांनी वाफे तयार करुन घेतले. लोखंडी सांगाड्याच्या सहायाने जमिनीत थोडे खड्डे तयार झाल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये 4 ते 5 पाच भाताचे दाणे टाकून त्यावर पुन्हा माती टाकली जाते. त्यामुळे बियाणे योग्य पद्धतीने जमिनीत पुरले जातात भात पेरताना दोन रोपांमधील अंतर 25 बाय 25 सेंटीमीटर व दोन रांगेमधील अंतर अर्धा फूट ठेवले आहे. त्यामुळे सर्व रोपं आणि सर्व रांगा सारख्या दिसतात. यामुळे आंतरमशागत करताना शेतकर्यांना त्रास होत नाही. त्यांनी आपल्या चार एकर जागेमध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून 10 माणसे कामाला घेतली असून चार साडेचार एकर जागेसाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. यासाठी फक्त 40 किलो बियाणे लागले आहे. विशेष म्हणजे भात लागवड करताना लागणारी मजुरांची चणचण यावर देखील त्यांनी मात केली आहे.
..अन् शेतकऱ्यांच्या पायाला भेगा का पडतात? याचा अनुभव मला आला : खासदार संभाजीराजे
या पद्धतीमुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत
या पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा वाफे तयार केल्यास पुढील पाच वर्षे लागवड करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे दरवर्षी नांगरणी, लागवड, गवत काढणी यावर होणारा मोठा खर्च वाचतो. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून पीक घेतल्यास याच शेतात रब्बी हंगामात दुसरे पीक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज नसल्याचे संजय भोईर यांनी सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली भात लागवड करावी, असे आवाहन संजय भोईर यांनी केले आहे. जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्या खर्चापेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपरिक लागवडीपेक्षा जास्त येते. शिवाय पिकांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते.
Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ