महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वीज नियामक आयोगाच्या चौकशीत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून तब्बल 22 हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार 225 कोटी रुपये लाटले आहेत. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे.
कृषिपंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट!
शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत -
शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन 1998 मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. कर कर्जा नही देंगे, बिजली का बिल नही देंगे, अशी घोषणा यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना याबाबत नेहमीच लढत राहिली आहे. आज शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, शेतकरी गेली 10 वर्षांपासून वीजे बिले भरत नाहीत. मात्र, तरीही बहुतांश शेतकरी हे वीज बिले भरत राहिले. काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीपंप वीज बिले माफ केल्याची घोषणाबाजी केली होती. काही काळ फक्त याची अंमलबजावणी झाली. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास सुरवात केली. वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग आहे. शेतकरी संघटनेची जी भूमिका होती, ती योग्य होती, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तरी शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज बिलाच्या माध्यमातून लुटण्यात आलेले पैसे परत मिळवण्यासाठी सरकारकडे तगादा लावला पाहिजे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे.
Web Exclusive | महावितरणकडून गोलमाल, शेतकऱ्यांना 30 हजार कोटींना लुटले? | ABP MAJHA